हा ब्लॉग शोधा

asach लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
asach लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, १३ ऑक्टोबर, २०२०

मन हे...

 मन हे... 



मन... हे मन असंच असतं... पाण्यासारखं... जो रंग मिसळू, तसंच होणारं. कधी आपण ठरवतो कि एखाद्या गोष्टीचा नाही विचार करायचा... पण हे मन बरोब्बर त्याच गोष्टीचा पाठलाग करत राहतं. उगाच अस्वस्थ करत राहतं. कधी काही गोष्टींचं पाल्हाळ लावतं, तर कधी एखाद्या गोष्टीविषयी वेल्हाळ होतं. याचा ना ठाव लागतो, ना एका ठिकाणी स्थिर राहतं. सतत नव्या गोष्टी, सतत नवे विचार, आणि या सर्वांत अडकलेलो आपण... 


कधी फुलांच्या मागे तर कधी फुलपाखराच्या मागे, कधी जमिनीवर तर कधी आकाशात...कधी गच्च भरलेलं तर कधी एकदम रिकामं...असंख्य विषय, अनेक भावना...याचा काहीच ठाव लागत नाही. नेहेमी चौकटीत वागणारे जरी आपण असू तरी या मनाचा परीघ मात्र लक्षातच येत नाही. कधी औदासीन्य, निराशेचे ढग गच्च दाटून येतात वादळ उठतं जोरदार... प्रत्येकच गोष्टीवर प्रश्नचिन्ह उभे राहतात. जगण्याच्या प्रयत्नांत हसू विसरायला होतं. समुद्राच्या लाटांसारख्या अनेक भावना निर्माण होतात आणि त्यांना परत स्वतःमध्ये सामावून घेण्याची ताकत सुद्धा या मनाचीच असते. अंधाऱ्या क्षणांमध्ये नव्या उजेडाची वाट या मनाच्या कोपऱ्यात साचवून ठेवलेले काही क्षण, आठवणी दाखवतात. उजेडाकडे जायचं की नाही हे आपणच ठरवायचं.सोबत कोणी असो नसो, आतून येणाऱ्या "तू चाल पुढं " अशा आवाजाला सोबत घेऊन पुढे चालत राहायचं.   

...आणि असे सगळे विचार डोक्यात गच्च भरलेले असताना मधेच मस्त उकळलेल्या चहाचा सुगंध नाकातून डायरेक्ट मनाला भिडलाय आणि विचार, लेखन वगैरे सोडून माझं हे मन चहाच्या मागे धावतंय... असो, आज एवढंच! 






गुरुवार, ६ ऑगस्ट, २०२०

तुझे आहे तुजपाशी

 तुझे आहे तुजपाशी...


क्षमता असतानाही अल्पसंतुष्ट राहणे म्हणजे आळशीपणा असा काहीसा समज असतो लोकांचा... पण क्षमता किंवा अल्पसंतुष्टी हे फार relative शब्द आहेत असं मला वाटतं. एखाद्याची क्षमता ठरवणारे आपण कोण असतो! हे ठरवणे मला योग्य वाटत नाही. तीच गोष्ट संतुष्टी ची! ह्या दोन्ही गोष्टी व्यक्तिसापेक्ष असतात. आणि प्रत्येक व्यक्ती एकाच प्रकारच्या वातावरणातून मोठा होत नसतो. त्यामुळे प्रत्येकाची संतुष्टीची व्याख्या वेगवेगळी असते. प्रत्येकाच्या आयुष्यात घडणाऱ्या घटना, आजूबाजूची माणसं, परिस्थिती सारखी नसते आणि अशा अनेक गोष्टी माणूस घडवायला कारणीभूत असतात. प्रत्येकाची विचारसरणी सुद्धा वेगवेगळी असते. प्रत्येक जण 'टाटा' नसतो. जमिनीवर बसून केळीच्या पानावर जेवले कि news होऊन कौतुक टाटांचं होणार. मोठ्या लोकांमधला साधा माणूस हे छानच आहे. पण एखाद्या व्यक्तीने स्वतःची ऐपत नसतानाही एखाद्याला मदत केली, स्वतःच्या तोंडचा घास share केला तर त्याची न्युज होत नाही. कारण आहे पैसे आणि पॉवर... आणि ती नसूनही समाधानी असणारी माणसं क्रियाहीन, आळशी आहेत का, तर नाही... एकटीने मुक्त आयुष्य जगणं शक्य असतानाही मुलांसाठी "adjust" करणारी आई आळशी असू शकत नाही. हां पण समाधानी मात्र असू शकते! career साठी/मुळे घरी मुलांकडे लक्ष न देता आल्याने नंतर त्यांना counselling करणाऱ्या आयांपेक्षा ही "adjust" वाली आई जास्त संतुष्ट असूच शकते. मनी आणि बबड्यांचं म्हणाल तर त्यांना independent(कामाबाबतीत) राहायला शिकवलं तर निष्क्रियता येत नाही त्यांच्या पण जीवनात. 


besides that, आपापली क्षमता जो तो प्रसंगांनुसार ठरवत असतो. आणि चॉईस पण असतो. काही जण क्षमता असूनही adjust करून अल्पसंतुष्ट राहायचा निर्णय घेतात आणि काही जण सर्व काही सोडून क्षमतांचा पुरेपूर वापर करून पैसा, मान, प्रतिष्ठा मिळवतात. इट्स ऑल अबाऊट चॉइसेस !

पैसा, मान, प्रतिष्ठा मिळवणारी व्यक्ती संतुष्ट असेलच असं नाही. उलट बरेचदा यासाठी तुम्हाला तुमची माणसं पणाला लावावी लागतात. एकटेपणा येतो, त्यातून नैराश्य आणि आत्महत्या वगैरे प्रकार घडतात. आपले यश/संतुष्टी पैशांवर/career growthवर अवलंबून असता कामा नये. यश /अपयश share करण्यासाठी लागतात माणसं, आपली माणसं! मग ती माणसं साधी असोत किंवा फोडणीची! वेळप्रसंगी family आणि  friendsच कामी येतात. आणि त्यांच्यासाठी थोडं adjust केलं तर नक्कीच चालतं! 


एखाद्याची क्षमता १०० पोरं जन्माला घालायची आहे पण तो २ वरच थांबला, अल्पसंतुष्ट राहिला तर तो आळशी आहे असा म्हणू नये. क्षमतेसोबतच आपल्याला कशामुळे संतुष्टी, शांती मिळते ते कळलं पाहिजे. आयुष्यात कुठे विश्रांती घ्यायची हे पण ठरवता आलं पाहिजे. दिवसातले २४ तास क्षमतेला upgrade करणारा पैसेवाल्या मोठ्या माणसातला साधा माणूस जर आपल्याला दिसतो तर साधारण गरजा असणारा, कष्ट करूनही सर्वांचा विचार करणारा, कधी अपेक्षेपेक्षा कमी मिळाले तरी share करूनही समाधानात राहणाऱ्या साध्या माणसातल्या  "मोठा" माणसाला पण appreciate केलं पाहिजे. 


काही गोष्टी फक्त क्षमता आहे म्हणून किंवा  hashtags पेक्षा आपल्या आनंदासाठी पण करायच्या असतात. आपला आनंद, समाधान, संतुष्टी आपल्याच हातात असतं. समोरच्याला judge करण्यापेक्षा ते आपल्याजवळच शोधलेलं बरं! शेवटी तुकोबा म्हणतातच " तुझे आहे तुजपाशी...  "






मंगळवार, २४ डिसेंबर, २०१९

पावट्याचं निमित्त


पावट्याचं निमित्त

म्हणी मला खूप आवडतात. मागच्याच वेळी एक म्हण लिहिण्यात आली आणि या पोस्टचं निमित्त झाली.
आपल्या सर्वांच्या आयुष्यात एक अशी गोष्ट म्हणा/ क्रिया म्हणा... आहे जी फारच सामान्य/ नेहेमीचीच आहे. सगळे लोक करतात पण सार्वजनिकरित्या हि गोष्ट टाळली जाते, किंबहुना तिचा उल्लेख पण आपण शक्यतो टाळतोच. मोकळेपणे याविषयी बोललं जात नाही. ह्या क्रियेविषयी बोलणं म्यानारलेस किंवा असांस्कृतिक, असामाजिक वगैरे समजलं जाऊ शकतं. पण आज इथे आम्ही या गोष्टीवरच लिहिणार !

तेव्हा आजचा विषय आहे  "पादणे "

बऱ्याच लोकांना हि क्रिया असभ्य वगैरे वाटते, पण हा एक अत्यंत नैसर्गिक शरीरधर्म आहे. शिंक येणे, खाज येणे हे जितकं नैसर्गिक, तितकीच नैसर्गिक असते हि "पाद-क्रिया"! माणूस/बाई जेवढ्या मोकळेपणे शिंकते तेवढ्या मोकळेपणे पादत मात्र नाही. काही लोकांना हि क्रिया आत्यंतिक असांस्कृतिक वगैरे वाटते. अशा व्यक्ती आपण जसं पादतच नाही असा अविर्भाव चेहेऱ्यावर आणून बसतात. पण जेवढं महत्त्वाचं शिंक येणं तेवढंच महत्त्वाचं पादणं असं माझं वैयक्तिक पण स्पष्ट मत आहे. या संपुर्ण विश्वात सर्वात समाधान किंवा सुख कशाने मिळते तर ते म्हणजे ज्या ठिकाणी खाज आलीये बरोब्बर त्याच स्पॉटला खाजवता येणे किंवा मोकळेपणे पादणे! जर कोणी मला सर्वात सुखी माणसाचं चित्र काढ असं म्हंटलं तर मी मोकळेपणे पादणाऱ्या व्यक्तीचं चित्र काढेन (बायका पादत नाहीत वगैरे मिथ्या गोष्टी आहेत. इथेपण टक्करका सामना मिळू शकतो हे मी शपथेवर सांगेन). पादणे हा आपल्या जीवनातला बहुमूल्य भाग आहे. (नाहीतर बसा पॉट धरून, डोकं धरून, 'मला कि नई कसंतरीच होतंय' म्हणत. एकदा का टुररकऩ पादलं कि सगळे त्रास बंद आहे कि नाही जादू! म्हणून बहुमूल्य!) आपण चारचौघात पादायला, त्याविषयी बोलायला संकोचतो खरं पण आपल्याला हे पण माहिती पाहिजे कि हि नैसर्गिक बाब फक्त हसण्यावारी नेण्यासारखी नाहीये. म्यानर्स च्या नावाखाली जर पादवायू फारवेळ दाबून ठेवला तर एखाद्याचा जीव पण जाऊ शकतो हे आपल्याला माहीतच नसतं. थोडा जिभेवर ताबा ठेवला तर हे प्रसंग टाळता येऊ शकतात पण कायमच नाही. तेव्हा आयुष्यभर संकोच करण्यापेक्षा मोकळेपणे,बिनधास्तपणे पादावं. एक्स्क्यूझ मी किंवा सॉरी म्हणून मोकळं व्हावं, एवढं सोप्पं आहे हे! आपण कितीतरी वेळा अश्या प्रसंगात असतो जेव्हा हे आपण करतो पण ! मस्तपैकी हसतो आणि मजा घेतो. कधी कधी विचार येतो कि हे जे महान वगैरे लोक होऊन गेले त्यांच्या आयुष्यात पण काही असे प्रसंग आलेच असतील नाही! त्यांच्या चरित्रांमध्ये एकदाही अशा मजेशीर प्रसंगाची नोंद आढळत नाही. कितीही झालं तरी हाडा-मांसाची माणसं ती ! ती कधी पादलीच नसतील हे म्हणणं अनैसर्गिक ठरेल नाही? पादण्याचा पण उल्लेख इतिहासात असता तर इतिहास सुद्धा आवडीचा विषय झाला असता.

(कधी असाच विचार करता-करता खालचे प्रसंग डोळ्यासमोर उभे राहिले. तसे काल्पनिक आहेत पण असे घडले पण असतील, कदाचित Image building वगैरे त्याही काळात असल्याने वगळले असतील चरित्रांमधून!
प्रसंग क्र.१: असा मस्तपैकी दरबार भरलेला आहे. कर माफ करण्याविषयी चर्चा चालू आहे, ब्रेक ची वेळ झाली. पावट्याची भाजी मस्तच झाल्याने जास्तंच खाऊन पादशाह सदरेवर आले आणि मधेच पादशाहांनी त्यांची तशरीफ थोडी वरच्या दिशेला ढकलली आणि शंखनाद केला. पावट्याचं महत्त्व लक्षात आल्याने पादशाहाने हुकूम दिला "कर ६२% वाढावा" (त्याला पावट्यावरचा कर वाढवायचा होता पण संतापात कर वाढवा म्हणाला ). सगळ्यांवरचाच कर ६२% वाढविण्यात आला.(६२% का ? तर असंच ! माझ्या डोक्यातली ष्टोरी आहे मला वाटलं ६२% म्हणून ६२%!)
प्रसंग क्र.२:  सामान्यांना कळेचना की कर माफ होणार असताना कर का वाढला, त्यामुळे सामान्य जनतेत अराजकता माजली. क्रांतिकारी संघटना स्थापन झाल्या. त्यांनी पादशाह सोबत युद्धाचं रणशिंग फुंकलं. पादशाहला तोपर्यंत पादण्याची सवय झालेली, पावटा जेवणात असो वा नसो! युद्ध सुरु झालं, वेगवेगळी शस्त्र वापरण्यात आली पण युद्धाच्या शेवटाचा मार्ग दिसेना. परस्पर सामंजस्याने युद्ध संपवावं असा ठराव पादशाहाने क्रांतिकारकांच्या लीडर समोर ठेवला.
प्रसंग क्र.३:  क्रांतिकारकांचा लीडर आणि पादशाह भेट होणार असते. पावट्यावरचा कर का वाढवला हे लीडरला समजावणार या धुंदीत पादशाह असतो. लीडर येतो, बैठक सुरु होते. पादशाहला त्याची चूक लक्षात येते एका पावट्यामुळे त्याने सर्व वस्तूंवर कर लादला, आणि तो कर माफ करायच्या निर्णयावर येतो. सवयीनुसार प्रेशर वाढल्याने पाद-वायू हळूच सोडण्याच्या प्रयत्नात एकदम जोरदार आवाज होतो. बैठकीत हसावं कि नाही या विवंचनेत बाकीचे असताना पादशाहाच जोरात खळखळून हसतो आणि खोटं- खोटं सांगतो की हा पावट्याच्या भाजीचा प्रताप आहे. आणि अशा प्रकारे पावट्याला निमित्त करून राजाने आपण पाद्रे आहोत हे मान्य करायचं टाळलं ! 
(यावरूनच पुढे महान म्हण अस्तित्त्वात आली "पाद्र्याला पावट्याचं निमित्त! ") कर रद्द झाले आणि युद्ध संपलं. 
वरच्या (भंगार छाप) लेखनावरून मी पुढच्या हाऊसफुलची स्क्रिप्ट लिहू शकेन असं वाटायला लागलंय! असो! )
तर... पादणं वाईट असतं का? नक्कीच नाही! उलट आपली पचनक्रिया व्यवस्थित असल्याचं मूर्तीमंत लक्षण आहे पादणे! पूर्वी इजिप्त का कुठले लोक म्हणे पादवायू बरणीत बंद करून ठेवत आणि आरोग्यासाठी चांगलं म्हणून त्याचा वास घेत असत. असो! पादण्याचे पण प्रकार असतात हे ३ इडियट्स मधे सांगितलंच आहे. हळूच पादणं काहीच लोकांना जमतं, स्किलच असतं ते ! काहीजण फक्त वास सोडतात आणि दुसऱ्यांवर नाव घेतात. (पाद-शाह शब्द यांच्याच मुळे आला असावा ) सुरतमध्ये पूर्वी एक स्पर्धा पण झालेली पादायची! अतिउत्साही कार्यकर्त्यांनी अशा स्पर्धांना जायला हरकत नाही.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे पादण्याने बी.पी. व्यवस्थित राहतं. रणवीर ची चिंग्स ची ऍड पाहिल्यावर प्रश्न पडला खरंच आग लागू शकते? तर हो! आपल्या  पादवायूला आग लागू शकते. प्राणी, किडे वगैरे सुद्धा पादतात! एका माणसाने दावा केलेला कि त्याच्या पादण्याने डास मरतात!
आता तुम्ही म्हणाल डोक्यावर पाटी लिहून फिरायचं का की "आम्ही पादतो"? असं म्हणणं नाही, पण जे गुप्त टूरक्या सोडून "मी नाही त्यातली" असं भासवतात किंवा पादवायू दाबून ठेवतात त्यांनी Denial मधे राहून स्वतःची तब्येत बिघडवून घेऊ नये. पादण्यामुळे मिळणाऱ्या आंतरिक सुख-समाधानाचा आस्वाद मोकळेपणे घ्यावा आणि दुसऱ्याला हसवण्याने मिळणारं फुकटचं पुण्य कमवावं !
  
अखिल भारतीय 'होईल वाद, पण हक्काने पाद' कमिटीला सादर समर्पित !

ता. क. : मी प्रयत्न केला चित्र काढायचा तो पुढीलप्रमाणे:







बुधवार, ११ डिसेंबर, २०१९

हे भलते अवघड असते


हे भलते अवघड असते

आपल्या जवळच्या व्यक्तींना आपण किती जपतो, त्यांचं आपल्या आयुष्यात किती महत्त्व आहे हे ती व्यक्ती दूर जाते तेव्हा मनात येतं. तो पर्यंत आपण त्यांचं असणं गृहीत धरत असतो. नंतर आपण असं वागलो असतो, असं जपलं असतं त्या व्यक्तीला, हे सर्व विचार करून हळहळण्यात काहीच पॉईंट नसतो.

ती प्रिय व्यक्ती सोबत असताना आपल्याला तिची किंमत कदाचित आपल्याला कळत नाही कारण नकळत आपण गृहीत धरलेलं असतं कि आपली व्यक्ती कायम राहणार आपल्या सोबत! आपण काळाच्या ओघात विसरूनच जातो कि हे सर्व शाश्वत नाहीये. इथे शाश्वत असेल तर एकंच गोष्ट... ती म्हणजे मृत्यू !
या मृत्यूचीच सर्वात जास्त भिती वाटते. का ? तर आपण गुंतत जातो, नात्यांमध्ये, माणसांमध्ये, भावनांमध्ये ! संवेदनशील असलं ना तर जरा जास्तंच भिती वाटते मृत्यूची. कदाचित स्वतःच्या नसेलही वाटत, पण जवळची व्यक्ती नसू पण शकते या शक्यतेला सुद्धा मन घाबरतं, भिती वाटते. ही वेळ दुसऱ्यावर असेल तर आपण किती सहजतेनं म्हणून जातो कि "खंबीर रहा", "आम्ही आहोत या दुःखात सोबत", पण खरंच त्या व्यक्तीचं दुःख आपल्याला कळतं ? त्या व्यक्तीने त्याच्या जवळच्या माणसासोबत घालवलेले अनेक क्षण, आनंदाचे म्हणा किंवा दुःखाचे आपल्याला माहीतही नसतात. त्यामुळे त्यांच्या आयुष्यातलं त्या जवळच्या माणसाचं महत्त्व आपल्याला कळण्याच्या पलीकडे असतं. अशा वेळी आपण सोबत आहोत एवढीच सांत्वना देऊ शकतो. या उपर काहीच शक्य नसतं. अवघड असते अशी वेळ...

आयुष्याचं पण विशेष आहे... सुख किंवा दुःख काहीच कायम राहत नाही. काही काळ खूप त्रास होतो आपलं माणूस नसण्याचा, पण हळू हळू सवय होत जाते त्या माणसाच्या नसण्याची. याचा अर्थ आपण त्यांना विसरलो का? तर नक्कीच नाही. कुठेतरी ती व्यक्ती नसण्याची सल मनात राहतेच. इतर गोष्टी, व्यक्ती, प्रेम यांमुळे त्या जखमेवर खपली येते. ती जखम बरी होतेही कदाचीत, पण ह्या जखमा व्रण मात्र सोडून जातात. ह्या जखमा असतात खऱ्या पण खरं कौशल्य त्यात अडकून न पडता पुढे जाण्यात आहे. सोपं तर नक्कीच नसतं, वेळ सुद्धा भरपूर लागतो पण आयुष्याचा Show must go on...  इतरही महत्त्वाच्या व्यक्तींचं प्रेम स्वीकारायचं आणि move on करायचं आयुष्यात. आज ना उद्या आपलं destination पण तेच शाश्वत सत्य आहे, पण त्याचाच विचार करत कुढत जगण्यापेक्षा "आज" चा स्विकार करून मस्तपैकी जगणं जमलं पाहीजे. 

आयुष्य मस्तपैकी जगलंच पाहिजे...




सोमवार, २१ ऑक्टोबर, २०१९

बातमीप्रेम


कालपरत्वे माणसाने बदलावं, हे तसं पाहता सहसा बरोबरच! पण या हि गोष्टीला अपवाद असतातच... लहानपणी ७ च्या बातम्या ते आजच्या २४ तास चालणाऱ्या वेगवेगळ्या वृत्त वाहिन्या (च्यायला अवघड आहे, त्यापेक्षा न्यूज चॅनल च म्हंटलेलं बरं) सतत पाहणारे काही महाभाग ओळखीचे आहेत. आमच्या शेजारी एक कुटुंब राहत असे. आमचे आजही नेहेमी येणे-जाणे असल्याने त्यांचं वेळापत्रक (TV चं ) छानपैकी माहिती आहे. त्या घरी राहणाऱ्या सर्व मंडळींची एक बेक्कार सवय आहे. त्यांच्या घरी TV दिवसभर चालू असतो. रात्री झोपायची वेळ झाली हेच एकमेव कारण बिचाऱ्या TVला विश्रांती देऊ शकतं. तुम्ही म्हणाल लाईट गेले तर ? त्यांच्याकडे जनरेटर आहे... (जास्त डोकं लावू नका, त्यांचं TV बिल, वीज बिल आम्ही किंवा तुम्ही भरत नसल्याने काही आक्षेप घेऊ शकत नाही.) तर ह्या मंडळींविषयी का लिहिलंय असं वाटणं स्वाभाविक आहे. पण ह्या पोस्टचं शिर्षक बातमीप्रेम असं आहे आणि यांच्या कुटुंबापेक्षा बातमीप्रेमाचं उत्तम उदाहरण असूच शकत नाही कारण हे जे दिवसभर टीव्ही चालतो, त्यावर फक्त आणि फक्त बातम्यांचेच चॅनल अखंड चालतात.

यांच्या कुटुंबातील व्यक्ती घरी आलं रे आलं कि पहिले त्यांचं आवडतं न्यूज चॅनल लावणार आणि (अगदी लहान मुलांना चॉकलेट वगैरे खाऊ मिळाल्यावर जो आनंद, जे समाधान मिळतं त्या लेव्हलच्या समाधानी चेहेऱ्याने) बातम्या पाहणार. मग त्यावरच्या बातम्यांनी पोट भरलं की दुसरा न्यूज चॅनल लावणार. (प्रोग्रामिंग मध्ये लूप ची संकल्पना यांच्यामुळेच आली असावी असं वाटतं. असो... ) हे न्यूज चॅनल वाले पण कमाल असतात राव, एकच बातमी प्रत्येक चॅनल वर वेगवेगळ्या पद्धतीने सादर करतात. ही creativity जबरदस्तच शिकण्यासारखी असते. (इथे मला आमच्या शिक्षणाचे दिवस आठवतात. पेपर लिहिताना आमच्यासारखे (आदरार्थी अनेकवचनी) सामान्य लोक उत्तराची लांबी वाढवण्यासाठी जी creativity वापरायचो ती हीच! फार फायदा होतो बरं! पण ते असो...)

तर असंच बातमी पाहता पाहता वेळ होते ती त्या debate ची... (आईशप्पथ जाम बोर होतं लोकांना टीव्ही वर भांडतांना पाहून. प्रत्यक्षातली भांडणं जास्त भारी असतात. एकदा रस्त्यावरून जाताना एक नवरा बायकोचं भांडण पाहिलं, जाम मजा आलेली... ती बाई त्या बाबाला हातात सापडेल त्याने मारत होती (दुसऱ्याच्या दुःखात आनंदी वगैरे होणाऱ्यातले नाही आपण, पण ते एकंदरीतच जाम विनोदी होतं) तो माणूस फुल्ल टुन्न होता आणि तिचा मार चुकवला कि एकदम खुश व्हायचा स्वतः वर आणि टाळी वगैरे वाजवायचा... शेवटी ती बाईच हसली याच्या अशा वागण्यावर, दमली पण होती बिचारी, शेवटी कपाळावर हात मारून निघून गेली...तर असो) अशा debate वेळी या मंडळींना जाम ऊत येतो. ते सर्व जण या debate वर ते प्रत्यक्ष घरीच चालू असल्यासाखे चवीने चर्चा करतात. आणि अशा चर्चेच्या वेळी जर कोणी चुकून घरी आलं, तर त्या व्यक्तीला सुद्धा (परीक्षेत कम्पलसरी प्रश्न असल्यासारखं) त्या चर्चेत सामील व्हावं लागतं. मधे एखादा ब्रेक वगैरे आलाच तर पाहुण्याला चहा-पाणी मिळतं, त्या वेळात त्याचं म्हणणं ऐकलं जातं आणि मग पुन्हा राष्ट्रीय कर्तव्य असल्याप्रमाणे सगळे debate वर परत भिडतात. या वेळापत्रकात कित्येक वर्षात काहीच बदल नाही. इतर लोकांच्या घरात ज्या चवीने आणि प्रेमाने सास-बहू वगैरे सिरीयल चालतात त्या प्रेमाने, त्या गोडीने, न्यूज चॅनलच्या टीआरपी ची जबाबदारी फक्त आणि फक्त यांच्या खांद्यावर असल्यासारखे हे लोक इथे न्यूज चॅनल पाहतात. (आता न्यूज चॅनल हि काय चवीने पाहायची गोष्ट आहे? एखाद्याने गोगलगाय खाऊन "वा! काय सुंदर चव आहे" असं म्हणून आयुष्यभर गोगलगाई खाण्यासारखं आहे हे ! (मला गोगलगाईची चव कशी काय माहिती? असा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे पण मी शुद्ध शाकाहारी आहे आणि गोगलगाय नुसती पाहून पण जाम किळस येते मला त्यामुळे ती खायला सुद्धा तशी किळसवाणीच असावी अशा पूर्वग्रहामुळे फक्त उदाहरणादाखल लिहिलं आहे. Animal rights वाल्यांनी फार मनावर घेऊ नका आम्ही (आदरार्थी अनेकवचनी)फक्त बडबड करतो.)

मी सुद्धा बातमीप्रेमी आहे काही अंशी. पण आपल्याला त्या न्यूज चॅनल्सचा जाम कंटाळा आहे राव...बरेचदा सीरिअसच असतं सगळं...सगळंच मजेशीर असावं असं आपलं(आदरार्थी अनेकवचनी! भारी वाटतं) मत नाही. पण नकारात्मक, सिरिअस पाहून पाहून डोकं पार हँग होऊन जातं. (महत्त्वाच्या बातम्या, बातम्या सांगणारे अँकर, पत्रकार वगैरे मंडळींवर अजिबात राग नाही. त्यांचं काम महत्वाचंच आहे पण एका लिमिट पेक्षा जास्त वास्तविकता पण सहन नाही होत मला. विरंगुळा हवाच आयुष्यात.) तर, उगीचच असणाऱ्या बातम्या आणि त्यांच्यावरच्या कमेंट्स वाचायला मला बरेचदा आणि फार आवडतं. आजकाल अशा बातम्या, त्यांच्या वरच्या कमेंट्स वाचणं असा छंदच जडलाय. विशेष म्हणजे अशा बातम्या असतात पण ढिगानं! ताजतवानं वाटतं अशा बातम्यांमुळे.
उदाहरण म्हणाल तर आता काही दिवसांपूर्वी एका प्रतिष्ठित वर्तमानपत्राच्या वेबसाईट वर दोघे पाठमोरे बसल्याचा फोटो होता. त्याचं शीर्षक असं होतं कि "हे लोकप्रिय कपल कोणतं आहे माहितेय का ?" आता हे फार साधं काहीतरी आहे असं वाटेल पण खरी गम्मत कमेंट मधे होती. त्यावरची सर्वात भारी कमेंट एकाने टाकलेली कि "ढुंगणावरून माणसे ओळखण्याइतपत इथली जनता अजून साक्षर झाली नाही. शैक्षणिक अभ्यासक्रमात या प्रगल्भ विषयाचा समावेश व्हावा." (दिवसच भारी गेला राव हे वाचून…) हे तर फक्त एकंच उदाहरण आहे. असं दररोज नवनवीन काहीतरी पाहिलं-वाचलं कि डोक्याचा बराचसा शीण नाहीसा होतो. ( अजूनच उदाहरणं म्हणाल तर - चुईंगगम चघळल्यामुळे होतं वजन कमी. कसं ते जाणून घ्या, रहस्यमय किड्याची मुंबईत दहशत, भंगारातल्या कार उडवण्याची स्पर्धा, भारताच्या विजयावर तैमूरचा जल्लोष, तैमूर माझा गोजिरवाणा वगैरे वगैरे (हो! हि मी interest घेऊन वाचलेल्या काही बातम्यांची शीर्षकं आहेत! duh!)) त्यामुळे वाटतं की कश्या का असेना बातम्या खरंच खूप आवश्यक आहेत.

(असो! अजून काही सुचत नाहीये आणि लिहून दमायला झालं आता, आता थांबतो आम्ही!(आदरार्थी अनेकवचनी))

बातमीप्रेम वगैरे काहीतरी लिहूनही हे पूर्ण वाचल्याबद्दल अभिनंदन!





शनिवार, १९ ऑक्टोबर, २०१९

पाऊस असा रुणझुणता...

आज अगदीच रिमझिम चाललीये पावसाची... अशी सुरुवात आणि title फक्त उगाच भारी वगैरे वाटावं म्हणून लिहिलंय. भर ऑक्टोबरात बिन सीजन बदाबदा कोसळणाऱ्या पावसाला पाहून असं काही सुचणं केवळ अशक्य किंवा फारच poetic वगैरे असू शकतं. काव्यमय वगैरे काही आपलं (आदरार्थी एकवचनी ! कोणी आपला आदर केला नाही तरी चालेल पण स्वतःला आपण वगैरे म्हंटलं कि जाम भारी वाटतं) मन नाही. कॉलेजात असताना बरेचसे पावसावर कविता करत असताना मोह झाला... म्हंटलं पावसावर आपणही करू कविता पण "टीप टीप" शिवाय काही सुचलं नाही पावसाविषयी... द्राक्षांचा व्यवसाय असल्याने म्हणा किंवा द्राक्षांवर प्रेम असल्याने म्हणा पण पावसाऐवजी द्राक्षांवर सुचली कविता...  (त्यातला शेवटचा भाग येथे टाकत आहे...किंबहुना तेवढंच आठवतंय आता)

"थोडी-थोडी हिरवी, खाल्ली भरपूर काळी,
परसाकडची घाई झाली नक्को त्या वेळी... "

आता एवढी वास्तववादी कविता पावसावर होणंच शक्य नव्हतं... आणि द्राक्षांवर प्रेम असलं म्हणून काय हो ते प्रेम जास्त झालं कि काय वेळ आणतं हे व्यक्त नको व्हायला ! तर असो पावसावरून द्राक्षांवर भरकटलोय हे कळालं. पण त्यानंतर कविता वगैरे प्रकार करायला रामराम ठोकला तो कायमचाच.

तर पाऊस ...  संदीप सलील चं हे पाऊस असा रुणझुणता  गाणं ऐकलं कि पावसाळा फारच romantic आहे असं वाटतं, पण ते मगाशी म्हंटल्याप्रमाणे फक्त title भारी वाटावं म्हणून घेतलंय. बाकी पाऊस म्हंटलं कि रिपरिप, चिकचिकाट झालेले रस्ते,गढूळ पाण्याने भरलेले रस्ते, डेंग्यू , मलेरिया, कुबट वास येणारे कपडे, पावसावरच्या अगणित कवितांचा पाऊस वगैरे वगैरे डोक्यात येतं. आता एवढंच येत का डोक्यात तर नाही हो... मातीचा तो मस्त वास, बहरलेली हिरवी गार सृष्टी, वाफाळलेल्या चहासोबत गरमागरम कांदाभजी वगैरे plus points पण आहेत पण हे आनंदाचे क्षण, हे  plus points घरकोंबड्यांसाठी! एखाद दिवस छान वाटतं हो पण दररोज पावसात गेलं कि वैतागच येतो. मग मी वर म्हंटल्याप्रमाणे गोष्टी मनात यायला लागतात. अर्थशास्त्रात एक सिद्धांत आहे "law of diminishing marginal utility" (ज्यांना अगदीच माहिती हवी आहे त्यांना त्याविषयी इथे सापडेल), आपल्या पावसाचं पण तसंच आहे. सुरुवातीला पाऊस जाम भारी वाटतो आणि हळूहळू 'कधी संपेल एकदाचा' असा होऊन जातो. आणि एवढं सगळं असून सुद्धा लोक लिहिणार कशावर तर म्हणे पाऊस! (आता आपल्याला पण मोह झालाच म्हणा पावसावर लिहिण्याचा... काहीतरी जादू आहेचे गड्या पावसात... पण आपलं वेगळं आहे!)

लहानपणीचा पाऊस म्हंटलं कि आठवतं कि कागदाच्या होड्या बनवायचो आणि सोडायचो पावसाच्या पाण्यात. त्या होड्यांची race लावायचो. त्यात पण मजा होती... जसे जसे मोठे झालो तसे विचार preferences बदलले, वाफाळलेला चहा घेण्यात मजा वाटायला लागली, मग केव्हातरी कांदाभजी पण भारी वाटायला लागली, भर पावसात एका छत्रीत दोघांनी फिरणं वगैरे romantic वाटायचं...  लहानपणीचे यार-दोस्त शिक्षणाच्या ओघात हरवले, नंतरच्या यार-दोस्तांसोबत चहा-कांदाभजीचे program व्हायला लागले. इथपर्यंत पाऊस लईच भारी वाटायचा. नंतर शहरात आलो सगळे आणि सगळंच बदललं.
मग एकाच छत्रीत दोघे म्हणजे बालिशपणा वाटायला लागला. भिजायचं तर मनसोक्त भिजा, हि नाटकं कशाला, त्यापेक्षा छत्री द्या एखाद्या गरजवंताला असं वाटायला लागलं. पावसाच्या पाण्यात होड्या सोडणारे आम्ही पावसालाच पाण्यात पाहायला लागलो.

सगळ्या (रस्त्यावरच्या म्हणा किंवा आययुष्यातल्या म्हणा ) खड्ड्यांमुळे पावसावर प्रेम करण्याइतकं अवास्तववादी राहिलं नाही मन आजकाल...

असो... हे सगळं टाईप करता करता आकाश (बाहेरचं आणि आतलं पण) मोकळं झालं कि... !




गुरुवार, १० ऑक्टोबर, २०१९

तो राजहंस एक...

तो राजहंस एक... 



आपलं पहिल्यापासूनच जरा वेगळंच आहे असं प्रत्येकालाच वाटतं पण आपल्यासारखे अनुभव असणारंच नाहीत म्हणून अनेक महाभागांना अंडरएस्टीमेट पण करता येत नाही. तर असो!

शाळेत असताना असंच वाटायचं कि आपल्यालाच कळलंय त्या कुरूप बदक-पिलाचं दुःख... बरं आमचं (म्हणजे आमच्या सारख्या सर्वसामान्य विद्यार्थी-विद्यार्थिनीचं ) कसं होतं ना की जोपर्यंत एखादी कविता परीक्षेमध्ये असायची तो पर्यंत ती अजिबातच झेपायची नाही. एकदा का परीक्षा संपली रे संपली कि त्या कवितांचा अर्थ थोडाफार समजायला लागे.(अजूनही बर्याचश्या कवितांचा अर्थ कळत नाही) अशाच जेव्हा (परीक्षेची) गरज होती तेव्हा न समजलेल्या कवितांपैकी हि ग. दि माडगूळकरांची सुंदर कविता.

हल्लीच्या पोरांना ह्या कविता रिलेट होतात कि नाही माहिती नाही (त्यांना मराठी तरी धड लिहिता-वाचता येते का हा प्रश्नच आहे, ते सर्व नंतर... ) पण आम्हाला अशा कविता जाम रिलेट व्हायच्या. आमच्या सुट्टीच्या वेळी " कोणी ना त्यास घेई खेळावयास संगे " आणि "भावंडं ना विचारी, सांगेल ते कुणाशी ? " वगैरे ओळी जामच आठवायच्या आणि सेंटीमेंटल कि काय व्हायचं. एकत्र कुटुंब असायची तेव्हा बरीच आणि नसली तरी सुट्ट्यांमध्ये गावी वगैरे एकत्रच यायची सर्व  चुलत, आते, मामे वगैरे भावंडं. तेव्हा असली धमाल करायचे सर्व कि एरवी मोठ्यांना घाबरणारे सुद्धा खोड्या काढायला लागायचे.

तर मुद्दा असा कि त्या कवितेतल्या कुरूप, वेड्या पिलाचं दुःख अशाच सुट्ट्यांमध्ये जी लहान भावंडं आहेत त्यांना ढिगाने व्हायचं. मोठी भावंडं गप्पांमध्ये घेणार नाहीत कारण यांना काय समजणार (आणि आधी कधी तरी गप्पांमध्ये घेतल्यावर कळलं नाही त्याचे अर्थ विचारत बसल्याने जाऊदे याला समाजवण्यापेक्षा न घेतलेलं बरं) ...आणि खेळताना तर काय पाणी पाजलंय म्हणून सांगू ... खेळून नव्हे, खरोखर पाण्याच्या बाटल्या घरातून भरून आणणे तहान लागली कि मोठ्या भावंडांना पाणी पाजणे अशी कामं करून. मोठ्यांना पाणी देणे, त्यांच्या वस्तू सांभाळणे, त्यांची कामं करणे, मैदान साफ करणे, त्यांच्या विनोदाचे विषय होणे अशा टुच्च्या कामांसाठीच लहान भावंडं असतात असा समज व्हायला लागलेला. अशा परिस्थितीत जेव्हा हि कविता परीक्षा देऊन झाल्यावर सुट्टीत थोडी फार कळायला लागली तेव्हा अगदीच सेंटी होऊन ह्या भावंडांना ऐकवली तेव्हा...
... तेव्हा ते पण सेंटी झाले असं समजलात तर साफ चुकलात लोकहो...  ती कविता ऐकवल्यावर "आले मोठे राजहंस " "पळ आता आमच्यासाठी काहीतरी खायला घेऊन ये " असं म्हणून हकालपट्टी झाली आणि अशा थोड्या फार समजलेल्या कविता भावंडांना ऐकवणं सोडून दिलं.

थोडक्यात काय, आमच्यात नव्याने उमललेल्या राजहंसाचं पुन्हा एकदा बदक झालं...