हा ब्लॉग शोधा

रविवार, ६ डिसेंबर, २०२०

रांग आणि टप्पे...

रांग आणि टप्पे...

 


आता तुम्ही म्हणाल हे काय नवं ? टप्पे म्हंटल की क्रिकेट वगैरे आठवेल. आपल्या भारतीयांची खासियत आहे, कशातपण आणि कुठेही क्रिकेट आठवतं... पण असो, आजच्या शीर्षकातले टप्पे म्हणजे बॉलचे टप्पे नसून माझे रांगेत उभं राहताना टाईमपास करायचे टप्पे आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे मूळ मुद्दा तो नाहीचए... खूप दिवसांनी झालेल्या कौतुकाची ही गोष्ट आहे

तर झालं काय, काही दिवसांपूर्वी बाहेरगावी गेलेलो दोघे... तुम्ही म्हणाल कोरोना... नाही नाही, तसं नाही, कामानिमित्तच गेलेलो. ..पा. कार्यालयात काम होतं थोडं! गेलो मग... तिथे ही भलीमोठ्ठी रांग! दोन मिनिट कौतुक वाटलं की काय लोकं सुधारली, social distancing वगैरे पाळत उभे आहेत लोकं...पाचच मिनिटात रांग एकदम छोटी झाली, म्हंटलं काय जादू आहे गड्या, पण लगेच लक्षात आलं की social distancing हळू हळू कमी होत खेटायला लागलेत सगळे एकमेकांना...  मनातल्या मनात हसणार एवढ्यात जोरदार शिट्टी वाजली आणि distancing पाळत रांग परत मोठी झाली.

मानसिकता कशी असते ना, गर्दी कितीही असो, आपल्यातलं आणि खिडकीमधलं अंतर कमी असलं की वेळ कमी लागेल असं वाटतं. कमी लोक पुढे असताना मध्ये जागा असून अंतर वाढलं तर वाटतं,अर्रे किती मोठी हि रांग, किती वेळ लागेल काही खरं नाही...आणि अचानक सवयीप्रमाणे आपण चुंबकासारखे एकमेकांकडे खेचले जातो आणि शिट्टी वाजली की परत social distancing. तिथे ती शिट्टी वाजवणारा पोलीस नसता तर अवघड होतं.

तर अशा या माहोल मध्ये मी राहिले रांगेत उभी... आमच्या घरात मला क्यू-एक्सपर्ट म्हणतात. कितीही रांग असली तरी मी शांत कशी असा प्रश्न सर्वांना पडतो. ते गुपित मी इथे उघड करते आहे. त्यासाठी माणसाने प्रचंड निवांssss असावं लागतं. असा निवांतपणा सिद्ध होण्यासाठी घरी तासंतास एका ठिकाणी बसण्याची तपस्या करावी लागते. यानंतर सुद्धा भयानक टाईमपास करायची, भंकस करायची प्रवृत्ती अंगात भिनववी लागते. कोणत्याही थुक्रट विनोदावर हसायची तयारी असावी लागते, शिवाय काम होवो होवो परत रांगेत उभं राहायची मानसिक तयारी सुद्धा असावी लागते. आणि मग तुम्हीही होऊ शकतात "क्यू-एक्सपर्ट","क्यू-एक्सपर्ट","क्यू-एक्सपर्ट"...लोकांना खूप लवकर कंटाळा येतो. मला व्यवस्थित कंटाळा येईपर्यंत टाईमपासच्या माझ्या काही phases आहेत. phase I मध्ये बाहेर असू तर सोप्पं पण building मधे असू तर खिडकी शोधायची आणि लहानपणी सारखं रस्त्यावर डोकवायचं आणि सर्रळ गाड्या मोजायच्या... बस किती, रिक्षा किती, दुचाकी किती, चारचाकी किती आल्या -गेल्या असं मोजत बसायचं... एवढा वेळ जातो शप्पथ... असो, phase I चा कंटाळा आला कि टाईमपास चेंज... phase II चालू... या टप्प्यात माणसांच्या चेहेऱ्यांवरून हा कोणता व्हिलन आहे असं imagine करून इथे जर त्याने हमला वगैरे केला तर आपण काय करायचं ते  imagine करत उभं राहायचं... लोक भरपूर असले की तेवढाच कल्पनेला वाव मिळतो... आणि phase II पर्यंत पण नंबर आला नाही तर phase III. सर्वात सोप्पा टप्पा... यात आपण आजूबाजूच्यांशी गप्पा टाकत उभं राहायचं... सामान्यतः इथपर्यंत आपला नंबर लागतोचअसो!

तर या वेळी मी रांगेत उभी असताना माझ्या समोरचे एक जण फारच पेटलेले होते. सिस्टीम आणि ..पा. मध्ये कामाला असणारे सर्व लोक कसे फक्त पगार घेतात आणि काम करत नाही ह्या विषयावर ओरडून ओरडून चर्चा करत होते. आता ते गृहस्थ चौथ्यांदा आले होते तरी काम झालं नव्हतं... मी सुद्धा अपवाद नव्हतेमी पण दुसऱ्या-तिसऱ्यांदा आलेले होते. आधी पुरेसे कागदपत्र नव्हते त्यामुळे परत त्यांनी सांगितलेले कागदपत्र घेऊन मी रांगेत उभी होते. हे आपलं असं आपलं तसं, मनात आणलं तर यांना सरळ करू वगैरे मोठ्या गप्पा करत उभे होते आणि त्यांचा नंबर आला. ह्यांनी ह्यांची कागदपत्र दिली समोरच्या मॅडमला, मॅडमने शांत, सौम्य आवाजात (खरंच ती बाई अपवाद होती) ह्या गृहस्थांना सांगितलं की हे-हे कागदपत्र नाहीत यामध्ये ते आणा मग काम होईल. ते शांत बोलणं ऐकून गृहस्थांनी एकदम तमाशा मोड ऑन केलं. काहीही बोलायला लागले. याला फोन लावतो त्याच्याशी बोलतो मी कोण आहे ते माहिती का नगरसेवक घरी आणून देईल असले कागद वगैरे वगैरे... आता मॅडम पण खवळल्या. म्हणे नगरसेवकालाच सांगा ते आणून देतील तुमच्या घरी. इथे कशाला रांगेत उभे राहता. इथून व्हा बाजूला आणि कोणाशी बोलायचं ते बोलून घ्या... ते गृहस्थ बाजूला उभे राहिले आणि मॅडमने माझे कागदपत्र माझ्या हातून घेतले, पाहिले आणि उभ्या राहिल्या, मला दचकायला झालं, काय झालं बुवा ? आश्चर्य म्हणजे माझे कागदपत्र पूर्ण होते आणि फॉर्म सुद्धा कधी नव्हे ते सुवाच्य अक्षरात भरलेला. त्या मॅडमने उभं राहून त्या सद्गृहस्थांना बोलावून माझी फाईल दाखवली, म्हणाल्या, हे पहा असं असायला हवं. यांना एकदा सांगून कळलं काय हवं काय नको ते तसं तुम्हाला एवढ्या वेळेला सांगूनही नाही कळत का... हे पहा आणि बाकीच्यांना पण दाखवा... सर्वांनी पाहिल्यावर माझे कागदपत्र जमा झाले

शाळेत असताना गृहपाठ करणाऱ्या आपण कधी नव्हे ते गृहपाठ करावा, बाकीच्यांनी केलेला नसावा आणि त्याच दिवशी supervisionला आपली वही दाखवून बाईंनी आपल्याला शाब्बासकी द्यावी तसं काहीसं झालेलं माझं. माझे पूर्ण कागदपत्र पाहून त्या मॅडमच्या डोळ्याच्या कडा कौतुकाने पाणवल्यात असा भास मला त्या क्षणी झाला. तिसरं विश्वयुद्ध वगैरे मीच थांबवलंय असं feeling आलं . खूप दिवसानी असं आणि इतकं कौतुक... एकदमच दाटून वगैरे कंठ आला. एकदम मान ताठ झाली, चालण्यात ऐट आली. रांगेत मागे उभे असणारे लोक superstarच्या आजूबाजूला जमणाऱ्या Fans सारखे माझ्या बाजूला जमले, सगळे मला विचारत होते काय केलं? कसं केलं? कोणते कोणते कागदपत्र लागतात, वगैरे वगैरे... लगा अपूनीच भगवान ! आणि एकाच क्षणात सातव्या आसमानात असलेल्या मला जोरदार शिट्टीने जमिनीवर आणलं. "काम झालं तर उगीच थांबू नका इकडे" या शब्दांनी मी स्वप्नातून सत्यात आले, पायांना वेग आला आणि घरी रवाना झाले... 

 


1 टिप्पणी: