हा ब्लॉग शोधा

मंगळवार, २२ डिसेंबर, २०२०

छंद... द नस्ते उद्योग

 छंद...  नस्ते उद्योग

मराठी मिडीयमची असल्याने पहिलेच स्पष्ट करते की इथे छंद म्हणजे "पद्याची घडण","लयबद्ध अक्षररचना" वगैरे वाला छंद नसून रिकामा वेळ घालवण्यासाठी timepass साठी हौस किंवा विरंगुळा म्हणून जे जे करतो तो छंद आहे. व्याकरणातल्या छंदांनी शाळेत भरपूर छळ केलाय, त्यामुळे त्याविषयी काही बोलणं म्हणजे आपल्या हद्दीतली गोष्टच नाहीये.मोकळा वेळ कारणी लागण्यासाठी असे छंद वगैरे बरे असतात. बहुतेक माणसांना काही ना काही छंद असतोResume वरच्या दाखवता येतील अशा छंदांपेक्षा नस्ते उद्योग प्रकारातल्या छंदांची मजा वेगळीअसते.

आता छंदांविषयी सगळ्यांचंच चांगलं मत असेल असं नाही. आमचे एक काका होते ओळखीचे... काहीही comment करणे हा त्यांचा छंद होता. काही जरी चांगलं केलं कुणी, काहीतरी फटकन बोलणारच. त्यांच्यासारखा अत्यंत अरसिक आणि खाष्ट माणूस सगळ्या जगात शोधून सापडायचा नाही. sarcasm आणि chandler bing वगैरे यांच्या नंतर आले. आपण काही कौतुकाने दाखवलं तर यात काय विशेष! हे उत्तर ठरलेलं असायचं. या छंद वगैरे नस्त्या उद्योगांचा काय उपयोग? असा त्यांचा कायम प्रश्न असायचा. प्रत्येक गोष्ट काही उपयुक्त असेलच असं काही नाही हे त्यांना मान्यच नव्हतं.असो...  मला लहानपणापासूनच निरनिराळे छंद जोपासायला आवडायचं (छंद 'केले' वगैरे म्हणाले तर अर्थच बदलेल त्यापेक्षा 'जोपासले' बरंय ). म्हणजे कंटाळा आला कि छंद change! तर असे कित्येक छंद आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये आले आणि गेले. . 

माझ्या छंदांची सुरुवात कधी झाली माहिती नाही, पण जेव्हा बूमर नावाचे चुईंगगम नुकतंच आलं तेव्हा त्याच्यासोबत ट्याटू फुकट मिळायचे. तेव्हा फुकट काही म्हंटलं की फार भारी वाटायचं. तर हे ट्याटू चं फ्याड त्यावेळी खूपच जोरात होतं. नवीनच काहीतरी... हातावर चित्र जशीच्या तशी छापता येतात यात काय मजा वाटायची! आधी ते स्टिकर वरचं कव्हर काढून हातावर लावायचं आणि पाण्याच्या थेंबाथेंबाने कागद हलक्या हाताने हळू हळू काढायचा तेव्हा कुठे ट्याटू हातावर नीट छापला जायचा. काय शायनिंग मारायचो ट्याटू लावले की! शाळेत चालायचं नाही (तसं घरी तरी कुठे चालत होतं म्हणा!) मग पोट भरून ओरडा खाल्ला की ते ट्याटू काढायची कसरत करावी लागायची. तसं पण ते तीन एक तासानंतर काळं पडून जायचं आणि निघायचं नाही लवकर , मग असं ते ट्याटू अंगावरून कंपासपेटीवर आणि नंतर दप्तरावर लावायला लागलो.सुरुवातीला ट्याटूवर वेडे-वाकडे चेहरे असायचे, नंतर किडे वगैरे असायचे,ते लावल्यावर खरंच किडा आहे कि काय म्हणून झटकायचा प्रयत्न पण होत असे. त्यातली मजा संपली. मग "संग्रह" हा शब्द आमच्या शब्दकोशात आला आणि आयुष्यातही... ते ट्याटू जमवायला लागले. पूर्वी लोक कंदील वापरायचे. त्यासाठी मेंटल लागायचं लोकांना. (मेंटल म्हंटल्यावर दचकायचं कारण नाही... कापड आणि कसलं रसायन यांची जाळी असायची जी कंदिलामध्ये लावली जात होती त्याचं नाव मेंटल. दुकानांमध्ये  मेंटल दे, दोन मेंटल द्या असे वाक्प्रयोग नेहेमीचे असायचे...आणि कोणाला वाईट पण वाटत नव्हतं. फार उशिरा कळलं ते Gas mantle आहे आणि त्याचा उच्चार म्यां - - असा काही आहे. पण तेव्हा सगळे मेंटलच म्हणायचे त्यामुळे आपल्यासाठी ते मेंटलच ! ) तर अशा त्या मेंटलचे मेटलचे डबे असायचे. कंपासपेटीच्या साधारण दुप्पट रुंदीचे ते डबे असत. असे दोन तीन डबे माझ्या ट्याटू जमवायच्या छंदाचे बळी गेले. (आता हे ट्याटू वगैरे जमवून काय फायदा होता तसा, पण छंदाला असं फायदा-तोट्यात मोजता येत नाही... )

त्यानंतर कशावर तरी शर्ट वर छापता येणारे ट्याटू मिळायचे. मग लगेच आम्ही इस्त्री घेऊन कामाला... ते प्रकरण घरी फारच तापलं (विचारूच नका) त्यामुळे ते पण संग्रहाच्या डब्यात टाकले जायला लागले. त्यानंतर आय लव्ह यू रसना म्हणत रसना सोबत मिळणारे प्लास्टिकचे किडे, पाली,झुरळं वगैरे संग्रही जमले. अंगात खाज एवढी कि शाळेत प्रार्थना झाल्यावर बर्रोब्बर जागेवर बसण्याआधी मैत्रिणीच्या अंगावर प्लास्टिकचं झुरळ टाकून दिलं... एकतर आमची मुलींची शाळा... असला गोंधळ झाला की विचारायची सोय नाही.बाईंचा (आमच्यावेळी मॅडम वगैरे नव्हतं) जाम ओरडा खाल्ला, शिक्षा मिळाली ते वेगळंच ! असो काही छंद असे अंगाशी येणारे पण असतात. wwfचे,cricketersचे cards जमवले,marbles जमवले,पेंसिलच्या शार्पनरमधून मिळणाऱ्या चकत्यांचे फुलं जमवले,(प्राणी संरक्षणवाले आक्षेप घेऊ शकतात पण तरी सांगते, मी आणि माझे भाऊ, आम्ही रिकाम्या  काडेपेडीमध्ये  मारलेले डास जमवायचो. हेलिकॉप्टरच्या किड्यांना दोरी बांधून उडवायचो, एका भावाने तर challenge दिलेलं तो माश्या मारत असे. आणि खरोखर त्याच्या सारख्या माश्या पकडणं आम्हाला अजून पण जमत नाही.या नस्त्या उद्योगांना छंद नाही म्हणणार. पण आठवलं आपलं सहजच... ) chocolate wrappers जमवले, स्टॅम्प्स गोळा केले, चांदोबा-चंपक-ठकठक जमवले... मग एकदा बातम्यांमध्ये ऐकलं की कोण्या माणसाने म्हणे त्याच्या संग्रहातलं जुनं नाणं काही लाखांना विकलं. झालं, आम्ही आमच्याकडची सगळी नाणी संग्रहात ठेवली. अशा कोणत्याही नाण्याला एवढी किंमत मिळत नाही हे कळेपर्यंत मोठा डबा भरला नाण्यांनी... एवढे पैसे आहेत हे कळल्यावर आईने दोन तीन रुपये देणं पण बंद केलं. मग हेच भंगलेलं लाखांच्या नाण्यांचं स्वप्न आणि सुट्टे पैसे घेऊन मी भरपूर दिवस काढले. काहीही आणायला जाताना घे सुट्टे नि जा असं चाललेलं. मैत्रिणी चिडवायच्या पण कि काय मग आज गंगेवर जाऊन आली वाटतं वगैरे... (पूर्वी कोणी काही बोललं तरी राग वगैरे येत नव्हता राव! हे ego बिगो थेरं शिंगं फुटल्यावर चालू झाली... ) असो !

जसा जसा काळ लोटत गेला तसे छंद पण बदलत गेले. कित्येकदा बासरी घेऊन वाजवायचा प्रयत्न केलाय पण या ना त्या कारणाने दोन दिवसांच्या वर ती बासरी बाहेर राहत नाही. मधल्या काळात पहा हौशी फोटोग्राफर्स चा पूर आलेला...सांगायला हरकत नाही, मी त्या पूरामधला एक थेंब! पण फक्त हौशेपोटी कॅमेरे बिमेरे नाही घेतले. परवडत पण नाही. तर मी फोनमधल्या कॅमेराचा पुरेपूर आस्वाद घेतलाय... एकदा बाहेरगावी गेलेलो तेव्हा मला रस्त्याच्या कडेला एक खूपच सुंदर रुईचं(?) फूल दिसलं. आता सौंदर्य काय पाहणाऱ्याच्या नजरेत असावं लागतं 😏... ट्रॅफिक पण नव्हती, तर मी गाडीतून उतरून त्याचा फोटो काढत होते. हा अँगल, तो अँगल, खाली बसून, उभी राहून... मी असं काही करत असले कि माझा नवरा मी हिला ओळखतच नाही असे भाव चेहेऱ्यावर घेऊन बाजूला उभा राहतो. ह्या वेळी त्याने गाडीतून उतरायची पण तसदी घेतली नाही. तर, माझी छंद-साधना पूर्ण करणं चालू असताना एक दुचाकी आली त्याने लांबूनच माझी साधना पहिली आणि तो सर-सकट confuse झाला... त्याने गाडीचा speed कमी केला आणि माझ्याकडे पाहत हळू हळू जाऊ लागला... त्याला एवढा प्रश्न पडला कि मी काय करतेय तो पुढे जाऊन सुद्धा मागे वळून गाडी चालवत होता. मी त्याच्याकडे पाहिलं तर एकदम त्याचा तोलच गेला... परत गाडीवर बसून तो पुढे निघून गेला. माझा नवरा आणि मी जोरात हसणार एवढ्यात तो दुचाकीस्वार यू-टर्न घेऊन परत आलेला... त्याने गाडी बाजूला लावली आणि थोड्या अंतरावर मोठ्ठ प्रश्नचिन्ह घेऊन पाहत उभा राहिला... मला पण जाम हुक्की आली मी मुद्दाम वर आकाशात पाहिलं फोटो काढला आणि परत " " expression देऊन आकाशात पाहत उभी राहिले. हे पाहून तो पण वर पाहायला लागला. हसू आवरत मी गंभीर मुद्रेने आकाशात पाहत होते. अजून एक-दोघं थांबले कुतूहलापोटी... ते पण वर काय दिसतंय ते पाहत होते. नवरोबाचं हसू फुटायवर होतं. मी फक्त एकदा बोट वर केलं आणि "ओह " म्हंटलं... तसं एकाने विचारलं काय हो मॅडम काय आहे? मी फक्त गंभीर मुद्रेने मान हलवली... तसं ते परत वर पाहायला लागले... आणखी लोक जमायला लागल्यावर मी हळूच काढता पाय घेतला. मी आणि नवरोबा तिथून पसार झालो आणि तासभर तरी वेड्यासारखं हसत होतो... आज सुद्धा मोबाईलने फोटो काढताना या प्रसंगाची हमखास आठवण येते आणि हसू येतं.

तर असे हे आमचे छंद आणि असे आमचे नस्ते उद्योग...! 
तळटीप : हाच तो रुईचा फोटो!(लगे फोटोग्राफी स्किल वगैरे काढू नका !)😎३ टिप्पण्या: