हा ब्लॉग शोधा

शनिवार, १९ ऑक्टोबर, २०१९

पाऊस असा रुणझुणता...

आज अगदीच रिमझिम चाललीये पावसाची... अशी सुरुवात आणि title फक्त उगाच भारी वगैरे वाटावं म्हणून लिहिलंय. भर ऑक्टोबरात बिन सीजन बदाबदा कोसळणाऱ्या पावसाला पाहून असं काही सुचणं केवळ अशक्य किंवा फारच poetic वगैरे असू शकतं. काव्यमय वगैरे काही आपलं (आदरार्थी एकवचनी ! कोणी आपला आदर केला नाही तरी चालेल पण स्वतःला आपण वगैरे म्हंटलं कि जाम भारी वाटतं) मन नाही. कॉलेजात असताना बरेचसे पावसावर कविता करत असताना मोह झाला... म्हंटलं पावसावर आपणही करू कविता पण "टीप टीप" शिवाय काही सुचलं नाही पावसाविषयी... द्राक्षांचा व्यवसाय असल्याने म्हणा किंवा द्राक्षांवर प्रेम असल्याने म्हणा पण पावसाऐवजी द्राक्षांवर सुचली कविता...  (त्यातला शेवटचा भाग येथे टाकत आहे...किंबहुना तेवढंच आठवतंय आता)

"थोडी-थोडी हिरवी, खाल्ली भरपूर काळी,
परसाकडची घाई झाली नक्को त्या वेळी... "

आता एवढी वास्तववादी कविता पावसावर होणंच शक्य नव्हतं... आणि द्राक्षांवर प्रेम असलं म्हणून काय हो ते प्रेम जास्त झालं कि काय वेळ आणतं हे व्यक्त नको व्हायला ! तर असो पावसावरून द्राक्षांवर भरकटलोय हे कळालं. पण त्यानंतर कविता वगैरे प्रकार करायला रामराम ठोकला तो कायमचाच.

तर पाऊस ...  संदीप सलील चं हे पाऊस असा रुणझुणता  गाणं ऐकलं कि पावसाळा फारच romantic आहे असं वाटतं, पण ते मगाशी म्हंटल्याप्रमाणे फक्त title भारी वाटावं म्हणून घेतलंय. बाकी पाऊस म्हंटलं कि रिपरिप, चिकचिकाट झालेले रस्ते,गढूळ पाण्याने भरलेले रस्ते, डेंग्यू , मलेरिया, कुबट वास येणारे कपडे, पावसावरच्या अगणित कवितांचा पाऊस वगैरे वगैरे डोक्यात येतं. आता एवढंच येत का डोक्यात तर नाही हो... मातीचा तो मस्त वास, बहरलेली हिरवी गार सृष्टी, वाफाळलेल्या चहासोबत गरमागरम कांदाभजी वगैरे plus points पण आहेत पण हे आनंदाचे क्षण, हे  plus points घरकोंबड्यांसाठी! एखाद दिवस छान वाटतं हो पण दररोज पावसात गेलं कि वैतागच येतो. मग मी वर म्हंटल्याप्रमाणे गोष्टी मनात यायला लागतात. अर्थशास्त्रात एक सिद्धांत आहे "law of diminishing marginal utility" (ज्यांना अगदीच माहिती हवी आहे त्यांना त्याविषयी इथे सापडेल), आपल्या पावसाचं पण तसंच आहे. सुरुवातीला पाऊस जाम भारी वाटतो आणि हळूहळू 'कधी संपेल एकदाचा' असा होऊन जातो. आणि एवढं सगळं असून सुद्धा लोक लिहिणार कशावर तर म्हणे पाऊस! (आता आपल्याला पण मोह झालाच म्हणा पावसावर लिहिण्याचा... काहीतरी जादू आहेचे गड्या पावसात... पण आपलं वेगळं आहे!)

लहानपणीचा पाऊस म्हंटलं कि आठवतं कि कागदाच्या होड्या बनवायचो आणि सोडायचो पावसाच्या पाण्यात. त्या होड्यांची race लावायचो. त्यात पण मजा होती... जसे जसे मोठे झालो तसे विचार preferences बदलले, वाफाळलेला चहा घेण्यात मजा वाटायला लागली, मग केव्हातरी कांदाभजी पण भारी वाटायला लागली, भर पावसात एका छत्रीत दोघांनी फिरणं वगैरे romantic वाटायचं...  लहानपणीचे यार-दोस्त शिक्षणाच्या ओघात हरवले, नंतरच्या यार-दोस्तांसोबत चहा-कांदाभजीचे program व्हायला लागले. इथपर्यंत पाऊस लईच भारी वाटायचा. नंतर शहरात आलो सगळे आणि सगळंच बदललं.
मग एकाच छत्रीत दोघे म्हणजे बालिशपणा वाटायला लागला. भिजायचं तर मनसोक्त भिजा, हि नाटकं कशाला, त्यापेक्षा छत्री द्या एखाद्या गरजवंताला असं वाटायला लागलं. पावसाच्या पाण्यात होड्या सोडणारे आम्ही पावसालाच पाण्यात पाहायला लागलो.

सगळ्या (रस्त्यावरच्या म्हणा किंवा आययुष्यातल्या म्हणा ) खड्ड्यांमुळे पावसावर प्रेम करण्याइतकं अवास्तववादी राहिलं नाही मन आजकाल...

असो... हे सगळं टाईप करता करता आकाश (बाहेरचं आणि आतलं पण) मोकळं झालं कि... !




४ टिप्पण्या:

  1. ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.

    उत्तर द्याहटवा
  2. ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.

    उत्तर द्याहटवा
  3. भिजाव वाटत असेल तर मनसोक्त भिजून घ्यावं कोसळत्या पावसात अगदी मन भरेपर्यंत..........
    छत्री पकडून ठेवण्याच्या नादात कित्येक थेंब निसटून जातात हातातून....

    उत्तर द्याहटवा