हा ब्लॉग शोधा

बुधवार, १६ सप्टेंबर, २०२०

लोणी, तूप आणि आठवणी...

 लोणी, तूप आणि आठवणी...

 


लग्नाला वर्षे झाली पण कधी तूप काढवलं नाही. दही लावते बऱ्याचदा, पण लोणी काढून तूप करायचा कंटाळा केला कारण विकतचं तूप आणलं जातं. आणि लोणी खाऊन पण दोनेक वर्षं झाली. बटर वगैरे मुळे लोण्याची मजा घालवली खरंच! पण बऱ्याच निर्धाराने दही लावलं, ताक केलं आणि लोणी सुद्धा काढलं. म्हंटलं चला एवढं केलंच आहे तर तूप पण होऊनच जाऊदे ! तूप लावलं कढवायला आणि त्या वासाने मन एकदम लहानपणाच्या आठवणीत रमलं.

काही गोष्टी असतातच अशा एकदम भूतकाळात घेऊन जाणाऱ्या... आज्जी आठवली! सगळे तिला 'काकी' म्हणायचे अगदी तिच्या सक्ख्या मुलांना सुद्धा तिला काकी म्हणून हाक मारतानाच पाहिलंय... आता असं का? याचं उत्तर नाही माझ्याजवळ, पण सगळे म्हणायचे म्हणून आम्ही सुद्धा तिला काकी आज्जी म्हणत असू. तर पूर्वी आम्ही almost एकत्र कुटुंब होतो तेव्हा दूध सुद्धा भरपूर लागत असे, त्यामुळे दही वगैरे पण भरपूर लावायची आमची काकी आज्जी. तिने ताक करायला घेतलं कि मी कायम तिच्याजवळ बसायचे. ती गोष्टी सांगायची त्या ऐकायचे. (यामुळे मला लोणी मिळणार असायचं. स्वार्थी कुणीकडची मी! असो... ) मस्त रवीने दही घुसळताना पाणी मी टाकायचे. असा मस्त फेस यायचा... आणि तोंडाला पाणी पण सुटायचं. मधे ती गोष्टी वगैरे सांगायची. त्यांपेक्षा लक्ष लोण्याकडेच असायचं. मग ताक झालं कि लोणी काढायची, मस्तपैकी एवढा मोठ्ठा गोळा बनायचा लोण्याचा. कित्येकदा हातावर चापटी खाल्ल्यात मोहापायी... पहिले त्यातल्या लोण्याचा नैवेद्य दाखवायची काकी ... अगदी रवीला सुद्धा थोडा नैवेद्य दाखवायची आणि मग लोण्याचा छोटा गोळा माझ्या हातात येत असे. (तशी पहिल्यापासूनच संयमी आहे थोडी त्यामुळे मला मिळायचा तो लोण्याचा गोळा! बाकी भावंडं कोणी एवढा वेळ बसायचे नाहीत त्यामुळे माझा फायदा होत असे.)  आमच्याकडे तेव्हा fridge नव्हता, मग तो मोठठा लोण्याचा गोळा काकी पाण्यात टाकायची आणि कपाटात ठेवायची

या कपाटावर आम्हा भावंडांचा कायम डोळा असायचा. तिथे कोणी नसल्याची खात्री झाली कि आमचं टोळकं तिथे यायचं आणि लोण्यावर ताव मारायचं. मग काकीचा संताप व्हायचा. पुढच्या वेळी ती भांडं वरच्या फडताळात ठेवायचीतिच्या हिशोबाप्रमाणे लोणी जमलं की वेळ यायची तुपाची! तिने तूप कढवायला ठेवलं कि आम्ही नजर ठेवून असायचो... तुपासाठी नाही तर बेरीसाठी! एव्हढ्या तुपाची बेरी सुद्धा भरपूर असायची. तूप कढवून झाल्यावर उरलेल्या बेरीत मस्त साखर टाकून आम्हाला मिळायची, त्यातसुद्धा आम्ही भांडण करत असू. मजा यायची.

 

अशा या आठवणी ...काकी पण वयपरत्वे गेली, मोठे झालो, जो तो या ना त्या कारणाने वेगवेळ्या ठिकाणी गेला आणि हि मजा संपली. राहिल्या फक्त आठवणी...लोण्यासारख्या मऊ मऊ आठवणी!

 
 
इक मुद्दतसे तेरी याद भी आयी ना हमें
और हम भूल गये हो तुझे ऐसा भी नहीं

(फिराक गोरखपुरी यांचा शेर)