हा ब्लॉग शोधा

मंगळवार, १३ ऑक्टोबर, २०२०

मन हे...

 मन हे... न... हे मन असंच असतं... पाण्यासारखं... जो रंग मिसळू, तसंच होणारं. कधी आपण ठरवतो कि एखाद्या गोष्टीचा नाही विचार करायचा... पण हे मन बरोब्बर त्याच गोष्टीचा पाठलाग करत राहतं. उगाच अस्वस्थ करत राहतं. कधी काही गोष्टींचं पाल्हाळ लावतं, तर कधी एखाद्या गोष्टीविषयी वेल्हाळ होतं. याचा ना ठाव लागतो, ना एका ठिकाणी स्थिर राहतं. सतत नव्या गोष्टी, सतत नवे विचार, आणि या सर्वांत अडकलेलो आपण... 


कधी फुलांच्या मागे तर कधी फुलपाखराच्या मागे, कधी जमिनीवर तर कधी आकाशात...कधी गच्च भरलेलं तर कधी एकदम रिकामं...असंख्य विषय, अनेक भावना...याचा काहीच ठाव लागत नाही. नेहेमी चौकटीत वागणारे जरी आपण असू तरी या मनाचा परीघ मात्र लक्षातच येत नाही. कधी औदासीन्य, निराशेचे ढग गच्च दाटून येतात वादळ उठतं जोरदार... प्रत्येकच गोष्टीवर प्रश्नचिन्ह उभे राहतात. जगण्याच्या प्रयत्नांत हसू विसरायला होतं. समुद्राच्या लाटांसारख्या अनेक भावना निर्माण होतात आणि त्यांना परत स्वतःमध्ये सामावून घेण्याची ताकत सुद्धा या मनाचीच असते. अंधाऱ्या क्षणांमध्ये नव्या उजेडाची वाट या मनाच्या कोपऱ्यात साचवून ठेवलेले काही क्षण, आठवणी दाखवतात. उजेडाकडे जायचं की नाही हे आपणच ठरवायचं.सोबत कोणी असो नसो, आतून येणाऱ्या "तू चाल पुढं " अशा आवाजाला सोबत घेऊन पुढे चालत राहायचं.   

...आणि असे सगळे विचार डोक्यात गच्च भरलेले असताना मधेच मस्त उकळलेल्या चहाचा सुगंध नाकातून डायरेक्ट मनाला भिडलाय आणि विचार, लेखन वगैरे सोडून माझं हे मन चहाच्या मागे धावतंय... असो, आज एवढंच!