हा ब्लॉग शोधा

सोमवार, २१ ऑक्टोबर, २०१९

बातमीप्रेम


कालपरत्वे माणसाने बदलावं, हे तसं पाहता सहसा बरोबरच! पण या हि गोष्टीला अपवाद असतातच... लहानपणी ७ च्या बातम्या ते आजच्या २४ तास चालणाऱ्या वेगवेगळ्या वृत्त वाहिन्या (च्यायला अवघड आहे, त्यापेक्षा न्यूज चॅनल च म्हंटलेलं बरं) सतत पाहणारे काही महाभाग ओळखीचे आहेत. आमच्या शेजारी एक कुटुंब राहत असे. आमचे आजही नेहेमी येणे-जाणे असल्याने त्यांचं वेळापत्रक (TV चं ) छानपैकी माहिती आहे. त्या घरी राहणाऱ्या सर्व मंडळींची एक बेक्कार सवय आहे. त्यांच्या घरी TV दिवसभर चालू असतो. रात्री झोपायची वेळ झाली हेच एकमेव कारण बिचाऱ्या TVला विश्रांती देऊ शकतं. तुम्ही म्हणाल लाईट गेले तर ? त्यांच्याकडे जनरेटर आहे... (जास्त डोकं लावू नका, त्यांचं TV बिल, वीज बिल आम्ही किंवा तुम्ही भरत नसल्याने काही आक्षेप घेऊ शकत नाही.) तर ह्या मंडळींविषयी का लिहिलंय असं वाटणं स्वाभाविक आहे. पण ह्या पोस्टचं शिर्षक बातमीप्रेम असं आहे आणि यांच्या कुटुंबापेक्षा बातमीप्रेमाचं उत्तम उदाहरण असूच शकत नाही कारण हे जे दिवसभर टीव्ही चालतो, त्यावर फक्त आणि फक्त बातम्यांचेच चॅनल अखंड चालतात.

यांच्या कुटुंबातील व्यक्ती घरी आलं रे आलं कि पहिले त्यांचं आवडतं न्यूज चॅनल लावणार आणि (अगदी लहान मुलांना चॉकलेट वगैरे खाऊ मिळाल्यावर जो आनंद, जे समाधान मिळतं त्या लेव्हलच्या समाधानी चेहेऱ्याने) बातम्या पाहणार. मग त्यावरच्या बातम्यांनी पोट भरलं की दुसरा न्यूज चॅनल लावणार. (प्रोग्रामिंग मध्ये लूप ची संकल्पना यांच्यामुळेच आली असावी असं वाटतं. असो... ) हे न्यूज चॅनल वाले पण कमाल असतात राव, एकच बातमी प्रत्येक चॅनल वर वेगवेगळ्या पद्धतीने सादर करतात. ही creativity जबरदस्तच शिकण्यासारखी असते. (इथे मला आमच्या शिक्षणाचे दिवस आठवतात. पेपर लिहिताना आमच्यासारखे (आदरार्थी अनेकवचनी) सामान्य लोक उत्तराची लांबी वाढवण्यासाठी जी creativity वापरायचो ती हीच! फार फायदा होतो बरं! पण ते असो...)

तर असंच बातमी पाहता पाहता वेळ होते ती त्या debate ची... (आईशप्पथ जाम बोर होतं लोकांना टीव्ही वर भांडतांना पाहून. प्रत्यक्षातली भांडणं जास्त भारी असतात. एकदा रस्त्यावरून जाताना एक नवरा बायकोचं भांडण पाहिलं, जाम मजा आलेली... ती बाई त्या बाबाला हातात सापडेल त्याने मारत होती (दुसऱ्याच्या दुःखात आनंदी वगैरे होणाऱ्यातले नाही आपण, पण ते एकंदरीतच जाम विनोदी होतं) तो माणूस फुल्ल टुन्न होता आणि तिचा मार चुकवला कि एकदम खुश व्हायचा स्वतः वर आणि टाळी वगैरे वाजवायचा... शेवटी ती बाईच हसली याच्या अशा वागण्यावर, दमली पण होती बिचारी, शेवटी कपाळावर हात मारून निघून गेली...तर असो) अशा debate वेळी या मंडळींना जाम ऊत येतो. ते सर्व जण या debate वर ते प्रत्यक्ष घरीच चालू असल्यासाखे चवीने चर्चा करतात. आणि अशा चर्चेच्या वेळी जर कोणी चुकून घरी आलं, तर त्या व्यक्तीला सुद्धा (परीक्षेत कम्पलसरी प्रश्न असल्यासारखं) त्या चर्चेत सामील व्हावं लागतं. मधे एखादा ब्रेक वगैरे आलाच तर पाहुण्याला चहा-पाणी मिळतं, त्या वेळात त्याचं म्हणणं ऐकलं जातं आणि मग पुन्हा राष्ट्रीय कर्तव्य असल्याप्रमाणे सगळे debate वर परत भिडतात. या वेळापत्रकात कित्येक वर्षात काहीच बदल नाही. इतर लोकांच्या घरात ज्या चवीने आणि प्रेमाने सास-बहू वगैरे सिरीयल चालतात त्या प्रेमाने, त्या गोडीने, न्यूज चॅनलच्या टीआरपी ची जबाबदारी फक्त आणि फक्त यांच्या खांद्यावर असल्यासारखे हे लोक इथे न्यूज चॅनल पाहतात. (आता न्यूज चॅनल हि काय चवीने पाहायची गोष्ट आहे? एखाद्याने गोगलगाय खाऊन "वा! काय सुंदर चव आहे" असं म्हणून आयुष्यभर गोगलगाई खाण्यासारखं आहे हे ! (मला गोगलगाईची चव कशी काय माहिती? असा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे पण मी शुद्ध शाकाहारी आहे आणि गोगलगाय नुसती पाहून पण जाम किळस येते मला त्यामुळे ती खायला सुद्धा तशी किळसवाणीच असावी अशा पूर्वग्रहामुळे फक्त उदाहरणादाखल लिहिलं आहे. Animal rights वाल्यांनी फार मनावर घेऊ नका आम्ही (आदरार्थी अनेकवचनी)फक्त बडबड करतो.)

मी सुद्धा बातमीप्रेमी आहे काही अंशी. पण आपल्याला त्या न्यूज चॅनल्सचा जाम कंटाळा आहे राव...बरेचदा सीरिअसच असतं सगळं...सगळंच मजेशीर असावं असं आपलं(आदरार्थी अनेकवचनी! भारी वाटतं) मत नाही. पण नकारात्मक, सिरिअस पाहून पाहून डोकं पार हँग होऊन जातं. (महत्त्वाच्या बातम्या, बातम्या सांगणारे अँकर, पत्रकार वगैरे मंडळींवर अजिबात राग नाही. त्यांचं काम महत्वाचंच आहे पण एका लिमिट पेक्षा जास्त वास्तविकता पण सहन नाही होत मला. विरंगुळा हवाच आयुष्यात.) तर, उगीचच असणाऱ्या बातम्या आणि त्यांच्यावरच्या कमेंट्स वाचायला मला बरेचदा आणि फार आवडतं. आजकाल अशा बातम्या, त्यांच्या वरच्या कमेंट्स वाचणं असा छंदच जडलाय. विशेष म्हणजे अशा बातम्या असतात पण ढिगानं! ताजतवानं वाटतं अशा बातम्यांमुळे.
उदाहरण म्हणाल तर आता काही दिवसांपूर्वी एका प्रतिष्ठित वर्तमानपत्राच्या वेबसाईट वर दोघे पाठमोरे बसल्याचा फोटो होता. त्याचं शीर्षक असं होतं कि "हे लोकप्रिय कपल कोणतं आहे माहितेय का ?" आता हे फार साधं काहीतरी आहे असं वाटेल पण खरी गम्मत कमेंट मधे होती. त्यावरची सर्वात भारी कमेंट एकाने टाकलेली कि "ढुंगणावरून माणसे ओळखण्याइतपत इथली जनता अजून साक्षर झाली नाही. शैक्षणिक अभ्यासक्रमात या प्रगल्भ विषयाचा समावेश व्हावा." (दिवसच भारी गेला राव हे वाचून…) हे तर फक्त एकंच उदाहरण आहे. असं दररोज नवनवीन काहीतरी पाहिलं-वाचलं कि डोक्याचा बराचसा शीण नाहीसा होतो. ( अजूनच उदाहरणं म्हणाल तर - चुईंगगम चघळल्यामुळे होतं वजन कमी. कसं ते जाणून घ्या, रहस्यमय किड्याची मुंबईत दहशत, भंगारातल्या कार उडवण्याची स्पर्धा, भारताच्या विजयावर तैमूरचा जल्लोष, तैमूर माझा गोजिरवाणा वगैरे वगैरे (हो! हि मी interest घेऊन वाचलेल्या काही बातम्यांची शीर्षकं आहेत! duh!)) त्यामुळे वाटतं की कश्या का असेना बातम्या खरंच खूप आवश्यक आहेत.

(असो! अजून काही सुचत नाहीये आणि लिहून दमायला झालं आता, आता थांबतो आम्ही!(आदरार्थी अनेकवचनी))

बातमीप्रेम वगैरे काहीतरी लिहूनही हे पूर्ण वाचल्याबद्दल अभिनंदन!





शनिवार, १९ ऑक्टोबर, २०१९

पाऊस असा रुणझुणता...

आज अगदीच रिमझिम चाललीये पावसाची... अशी सुरुवात आणि title फक्त उगाच भारी वगैरे वाटावं म्हणून लिहिलंय. भर ऑक्टोबरात बिन सीजन बदाबदा कोसळणाऱ्या पावसाला पाहून असं काही सुचणं केवळ अशक्य किंवा फारच poetic वगैरे असू शकतं. काव्यमय वगैरे काही आपलं (आदरार्थी एकवचनी ! कोणी आपला आदर केला नाही तरी चालेल पण स्वतःला आपण वगैरे म्हंटलं कि जाम भारी वाटतं) मन नाही. कॉलेजात असताना बरेचसे पावसावर कविता करत असताना मोह झाला... म्हंटलं पावसावर आपणही करू कविता पण "टीप टीप" शिवाय काही सुचलं नाही पावसाविषयी... द्राक्षांचा व्यवसाय असल्याने म्हणा किंवा द्राक्षांवर प्रेम असल्याने म्हणा पण पावसाऐवजी द्राक्षांवर सुचली कविता...  (त्यातला शेवटचा भाग येथे टाकत आहे...किंबहुना तेवढंच आठवतंय आता)

"थोडी-थोडी हिरवी, खाल्ली भरपूर काळी,
परसाकडची घाई झाली नक्को त्या वेळी... "

आता एवढी वास्तववादी कविता पावसावर होणंच शक्य नव्हतं... आणि द्राक्षांवर प्रेम असलं म्हणून काय हो ते प्रेम जास्त झालं कि काय वेळ आणतं हे व्यक्त नको व्हायला ! तर असो पावसावरून द्राक्षांवर भरकटलोय हे कळालं. पण त्यानंतर कविता वगैरे प्रकार करायला रामराम ठोकला तो कायमचाच.

तर पाऊस ...  संदीप सलील चं हे पाऊस असा रुणझुणता  गाणं ऐकलं कि पावसाळा फारच romantic आहे असं वाटतं, पण ते मगाशी म्हंटल्याप्रमाणे फक्त title भारी वाटावं म्हणून घेतलंय. बाकी पाऊस म्हंटलं कि रिपरिप, चिकचिकाट झालेले रस्ते,गढूळ पाण्याने भरलेले रस्ते, डेंग्यू , मलेरिया, कुबट वास येणारे कपडे, पावसावरच्या अगणित कवितांचा पाऊस वगैरे वगैरे डोक्यात येतं. आता एवढंच येत का डोक्यात तर नाही हो... मातीचा तो मस्त वास, बहरलेली हिरवी गार सृष्टी, वाफाळलेल्या चहासोबत गरमागरम कांदाभजी वगैरे plus points पण आहेत पण हे आनंदाचे क्षण, हे  plus points घरकोंबड्यांसाठी! एखाद दिवस छान वाटतं हो पण दररोज पावसात गेलं कि वैतागच येतो. मग मी वर म्हंटल्याप्रमाणे गोष्टी मनात यायला लागतात. अर्थशास्त्रात एक सिद्धांत आहे "law of diminishing marginal utility" (ज्यांना अगदीच माहिती हवी आहे त्यांना त्याविषयी इथे सापडेल), आपल्या पावसाचं पण तसंच आहे. सुरुवातीला पाऊस जाम भारी वाटतो आणि हळूहळू 'कधी संपेल एकदाचा' असा होऊन जातो. आणि एवढं सगळं असून सुद्धा लोक लिहिणार कशावर तर म्हणे पाऊस! (आता आपल्याला पण मोह झालाच म्हणा पावसावर लिहिण्याचा... काहीतरी जादू आहेचे गड्या पावसात... पण आपलं वेगळं आहे!)

लहानपणीचा पाऊस म्हंटलं कि आठवतं कि कागदाच्या होड्या बनवायचो आणि सोडायचो पावसाच्या पाण्यात. त्या होड्यांची race लावायचो. त्यात पण मजा होती... जसे जसे मोठे झालो तसे विचार preferences बदलले, वाफाळलेला चहा घेण्यात मजा वाटायला लागली, मग केव्हातरी कांदाभजी पण भारी वाटायला लागली, भर पावसात एका छत्रीत दोघांनी फिरणं वगैरे romantic वाटायचं...  लहानपणीचे यार-दोस्त शिक्षणाच्या ओघात हरवले, नंतरच्या यार-दोस्तांसोबत चहा-कांदाभजीचे program व्हायला लागले. इथपर्यंत पाऊस लईच भारी वाटायचा. नंतर शहरात आलो सगळे आणि सगळंच बदललं.
मग एकाच छत्रीत दोघे म्हणजे बालिशपणा वाटायला लागला. भिजायचं तर मनसोक्त भिजा, हि नाटकं कशाला, त्यापेक्षा छत्री द्या एखाद्या गरजवंताला असं वाटायला लागलं. पावसाच्या पाण्यात होड्या सोडणारे आम्ही पावसालाच पाण्यात पाहायला लागलो.

सगळ्या (रस्त्यावरच्या म्हणा किंवा आययुष्यातल्या म्हणा ) खड्ड्यांमुळे पावसावर प्रेम करण्याइतकं अवास्तववादी राहिलं नाही मन आजकाल...

असो... हे सगळं टाईप करता करता आकाश (बाहेरचं आणि आतलं पण) मोकळं झालं कि... !




गुरुवार, १० ऑक्टोबर, २०१९

तो राजहंस एक...

तो राजहंस एक... 



आपलं पहिल्यापासूनच जरा वेगळंच आहे असं प्रत्येकालाच वाटतं पण आपल्यासारखे अनुभव असणारंच नाहीत म्हणून अनेक महाभागांना अंडरएस्टीमेट पण करता येत नाही. तर असो!

शाळेत असताना असंच वाटायचं कि आपल्यालाच कळलंय त्या कुरूप बदक-पिलाचं दुःख... बरं आमचं (म्हणजे आमच्या सारख्या सर्वसामान्य विद्यार्थी-विद्यार्थिनीचं ) कसं होतं ना की जोपर्यंत एखादी कविता परीक्षेमध्ये असायची तो पर्यंत ती अजिबातच झेपायची नाही. एकदा का परीक्षा संपली रे संपली कि त्या कवितांचा अर्थ थोडाफार समजायला लागे.(अजूनही बर्याचश्या कवितांचा अर्थ कळत नाही) अशाच जेव्हा (परीक्षेची) गरज होती तेव्हा न समजलेल्या कवितांपैकी हि ग. दि माडगूळकरांची सुंदर कविता.

हल्लीच्या पोरांना ह्या कविता रिलेट होतात कि नाही माहिती नाही (त्यांना मराठी तरी धड लिहिता-वाचता येते का हा प्रश्नच आहे, ते सर्व नंतर... ) पण आम्हाला अशा कविता जाम रिलेट व्हायच्या. आमच्या सुट्टीच्या वेळी " कोणी ना त्यास घेई खेळावयास संगे " आणि "भावंडं ना विचारी, सांगेल ते कुणाशी ? " वगैरे ओळी जामच आठवायच्या आणि सेंटीमेंटल कि काय व्हायचं. एकत्र कुटुंब असायची तेव्हा बरीच आणि नसली तरी सुट्ट्यांमध्ये गावी वगैरे एकत्रच यायची सर्व  चुलत, आते, मामे वगैरे भावंडं. तेव्हा असली धमाल करायचे सर्व कि एरवी मोठ्यांना घाबरणारे सुद्धा खोड्या काढायला लागायचे.

तर मुद्दा असा कि त्या कवितेतल्या कुरूप, वेड्या पिलाचं दुःख अशाच सुट्ट्यांमध्ये जी लहान भावंडं आहेत त्यांना ढिगाने व्हायचं. मोठी भावंडं गप्पांमध्ये घेणार नाहीत कारण यांना काय समजणार (आणि आधी कधी तरी गप्पांमध्ये घेतल्यावर कळलं नाही त्याचे अर्थ विचारत बसल्याने जाऊदे याला समाजवण्यापेक्षा न घेतलेलं बरं) ...आणि खेळताना तर काय पाणी पाजलंय म्हणून सांगू ... खेळून नव्हे, खरोखर पाण्याच्या बाटल्या घरातून भरून आणणे तहान लागली कि मोठ्या भावंडांना पाणी पाजणे अशी कामं करून. मोठ्यांना पाणी देणे, त्यांच्या वस्तू सांभाळणे, त्यांची कामं करणे, मैदान साफ करणे, त्यांच्या विनोदाचे विषय होणे अशा टुच्च्या कामांसाठीच लहान भावंडं असतात असा समज व्हायला लागलेला. अशा परिस्थितीत जेव्हा हि कविता परीक्षा देऊन झाल्यावर सुट्टीत थोडी फार कळायला लागली तेव्हा अगदीच सेंटी होऊन ह्या भावंडांना ऐकवली तेव्हा...
... तेव्हा ते पण सेंटी झाले असं समजलात तर साफ चुकलात लोकहो...  ती कविता ऐकवल्यावर "आले मोठे राजहंस " "पळ आता आमच्यासाठी काहीतरी खायला घेऊन ये " असं म्हणून हकालपट्टी झाली आणि अशा थोड्या फार समजलेल्या कविता भावंडांना ऐकवणं सोडून दिलं.

थोडक्यात काय, आमच्यात नव्याने उमललेल्या राजहंसाचं पुन्हा एकदा बदक झालं...





बुधवार, ९ ऑक्टोबर, २०१९

असंबद्ध बडबडीची सुरुवात...

असंबद्ध वगैरे वागणे हा छंद म्हणा किंवा प्रवृत्ती पण त्यामुळे बडबडीत, लिहिण्यात सुद्धा असंबद्धता येणारच. आता यासाठी ब्लॉग वगैरे का? कशाला? कशासाठी? असे फालतू प्रश्न विचारण्यात काही अर्थचं नाही कारण मुळातच ब्लॉगचं नाव असंबद्ध बडबड असं आहे, आणि त्याचमुळे कारणं सुद्धा तशी असंबद्धच आहेत. वेळ जात नव्हता, रिकामा वेळ ढिगाने आहे, ब्लॉग फुकटच आहे. मग तुम्ही म्हणाल असे विचार एकतर मनातच ठेवायचे किंवा डायरीत वगैरे लिहायचे. पण डायरी, पेन साठी खर्च करावा लागतो. तुम्ही म्हणाल मग ऑनलाईन लिहायला पण खर्च लागतो कि , तर लोकहो माझ्याकडे उगीचच पडलेला कंप्युटर आणि इंटरनेट कनेक्शन (च्यायला हा शबद मराठीत टाईप करताना जाम तंतरलेली.) आधीच सहज उपलब्ध आहेत. त्यांचा थोडाफार सदुपयोग व्हावा आणि मनातले विचार व्यक्त करता यावे यासाठी हा प्रपंच...


आता माणूस आहे म्हंटल्यावर विचार चिक्कार येतात. मग ते विचार (कधी चांगले पण बऱ्याचदा फालतू का असेना) असे मुक्तपणे उधळावेत अश्या निश्चयाने हा ब्लॉग सुरु करत आहे. तुम्ही म्हणाल येडंच दिसतंय , पण लोकहो, मोठ्या लोकांना अशा टीकेला सामोरं जावंच लागतंय सुरुवातीला... नंतर कधीतरी ई- उत्खननात हे सापडलं तर मोठमोठे लोक याचा अर्थ लावत बसतील या आशेने (जो पर्यंत कंटाळा येत नाही तोपर्यंत (आता कोणाला ते विचारू नका)) ह्या प्रवासाला सुरुवात करत आहे...




ता. क. : मनामध्ये कित्येक विचार रुंजी घालतात, किती फुटकळ असोत किंवा चिंतनात्मक... त्या विचारांना व्यक्त करण्याचा प्रयत्न म्हणजे मनः उवाच...! एका मित्राने सांगितल्या प्रमाणे जरा update केलाय blog. header च चित्र त्याचं आहे. पहिलेपेक्षा नक्कीच छान झालंय रूपपरिवर्तन... thank god for friends..