हा ब्लॉग शोधा

friends लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
friends लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, २२ डिसेंबर, २०२०

छंद... द नस्ते उद्योग

 छंद...  द नस्ते उद्योग

मराठी मिडीयमची असल्याने पहिलेच स्पष्ट करते की इथे छंद म्हणजे "पद्याची घडण","लयबद्ध अक्षररचना" वगैरे वाला छंद नसून रिकामा वेळ घालवण्यासाठी timepass साठी हौस किंवा विरंगुळा म्हणून जे जे करतो तो छंद आहे. व्याकरणातल्या छंदांनी शाळेत भरपूर छळ केलाय, त्यामुळे त्याविषयी काही बोलणं म्हणजे आपल्या हद्दीतली गोष्टच नाहीये.मोकळा वेळ कारणी लागण्यासाठी असे छंद वगैरे बरे असतात. बहुतेक माणसांना काही ना काही छंद असतो. Resume वरच्या दाखवता येतील अशा छंदांपेक्षा नस्ते उद्योग प्रकारातल्या छंदांची मजा वेगळीचअसते.

आता छंदांविषयी सगळ्यांचंच चांगलं मत असेल असं नाही. आमचे एक काका होते ओळखीचे... काहीही comment करणे हा त्यांचा छंद होता. काही जरी चांगलं केलं कुणी, काहीतरी फटकन बोलणारच. त्यांच्यासारखा अत्यंत अरसिक आणि खाष्ट माणूस सगळ्या जगात शोधून सापडायचा नाही. sarcasm आणि chandler bing वगैरे यांच्या नंतर आले. आपण काही कौतुकाने दाखवलं तर यात काय विशेष! हे उत्तर ठरलेलं असायचं. या छंद वगैरे नस्त्या उद्योगांचा काय उपयोग? असा त्यांचा कायम प्रश्न असायचा. प्रत्येक गोष्ट काही उपयुक्त असेलच असं काही नाही हे त्यांना मान्यच नव्हतं.असो...  मला लहानपणापासूनच निरनिराळे छंद जोपासायला आवडायचं (छंद 'केले' वगैरे म्हणाले तर अर्थच बदलेल त्यापेक्षा 'जोपासले'च बरंय ). म्हणजे कंटाळा आला कि छंद change! तर असे कित्येक छंद आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये आले आणि गेले. . 

माझ्या छंदांची सुरुवात कधी झाली माहिती नाही, पण जेव्हा बूमर नावाचे चुईंगगम नुकतंच आलं तेव्हा त्याच्यासोबत ट्याटू फुकट मिळायचे. तेव्हा फुकट काही म्हंटलं की फार भारी वाटायचं. तर हे ट्याटू चं फ्याड त्यावेळी खूपच जोरात होतं. नवीनच काहीतरी... हातावर चित्र जशीच्या तशी छापता येतात यात काय मजा वाटायची! आधी ते स्टिकर वरचं कव्हर काढून हातावर लावायचं आणि पाण्याच्या थेंबाथेंबाने कागद हलक्या हाताने हळू हळू काढायचा तेव्हा कुठे ट्याटू हातावर नीट छापला जायचा. काय शायनिंग मारायचो ट्याटू लावले की! शाळेत चालायचं नाही (तसं घरी तरी कुठे चालत होतं म्हणा!) मग पोट भरून ओरडा खाल्ला की ते ट्याटू काढायची कसरत करावी लागायची. तसं पण ते तीन एक तासानंतर काळं पडून जायचं आणि निघायचं नाही लवकर , मग असं ते ट्याटू अंगावरून कंपासपेटीवर आणि नंतर दप्तरावर लावायला लागलो.सुरुवातीला ट्याटूवर वेडे-वाकडे चेहरे असायचे, नंतर किडे वगैरे असायचे,ते लावल्यावर खरंच किडा आहे कि काय म्हणून झटकायचा प्रयत्न पण होत असे. त्यातली मजा संपली. मग "संग्रह" हा शब्द आमच्या शब्दकोशात आला आणि आयुष्यातही... ते ट्याटू जमवायला लागले. पूर्वी लोक कंदील वापरायचे. त्यासाठी मेंटल लागायचं लोकांना. (मेंटल म्हंटल्यावर दचकायचं कारण नाही... कापड आणि कसलं रसायन यांची जाळी असायची जी कंदिलामध्ये लावली जात होती त्याचं नाव मेंटल. दुकानांमध्ये ए मेंटल दे, दोन मेंटल द्या असे वाक्प्रयोग नेहेमीचे असायचे...आणि कोणाला वाईट पण वाटत नव्हतं. फार उशिरा कळलं ते Gas mantle आहे आणि त्याचा उच्चार म्यां -ट -ल असा काही आहे. पण तेव्हा सगळे मेंटलच म्हणायचे त्यामुळे आपल्यासाठी ते मेंटलच ! ) तर अशा त्या मेंटलचे मेटलचे डबे असायचे. कंपासपेटीच्या साधारण दुप्पट रुंदीचे ते डबे असत. असे दोन तीन डबे माझ्या ट्याटू जमवायच्या छंदाचे बळी गेले. (आता हे ट्याटू वगैरे जमवून काय फायदा होता तसा, पण छंदाला असं फायदा-तोट्यात मोजता येत नाही... )

त्यानंतर कशावर तरी शर्ट वर छापता येणारे ट्याटू मिळायचे. मग लगेच आम्ही इस्त्री घेऊन कामाला... ते प्रकरण घरी फारच तापलं (विचारूच नका) त्यामुळे ते पण संग्रहाच्या डब्यात टाकले जायला लागले. त्यानंतर आय लव्ह यू रसना म्हणत रसना सोबत मिळणारे प्लास्टिकचे किडे, पाली,झुरळं वगैरे संग्रही जमले. अंगात खाज एवढी कि शाळेत प्रार्थना झाल्यावर बर्रोब्बर जागेवर बसण्याआधी मैत्रिणीच्या अंगावर प्लास्टिकचं झुरळ टाकून दिलं... एकतर आमची मुलींची शाळा... असला गोंधळ झाला की विचारायची सोय नाही.बाईंचा (आमच्यावेळी मॅडम वगैरे नव्हतं) जाम ओरडा खाल्ला, शिक्षा मिळाली ते वेगळंच ! असो काही छंद असे अंगाशी येणारे पण असतात. wwfचे,cricketersचे cards जमवले,marbles जमवले,पेंसिलच्या शार्पनरमधून मिळणाऱ्या चकत्यांचे फुलं जमवले,(प्राणी संरक्षणवाले आक्षेप घेऊ शकतात पण तरी सांगते, मी आणि माझे भाऊ, आम्ही रिकाम्या  काडेपेडीमध्ये  मारलेले डास जमवायचो. हेलिकॉप्टरच्या किड्यांना दोरी बांधून उडवायचो, एका भावाने तर challenge दिलेलं तो माश्या मारत असे. आणि खरोखर त्याच्या सारख्या माश्या पकडणं आम्हाला अजून पण जमत नाही.या नस्त्या उद्योगांना छंद नाही म्हणणार. पण आठवलं आपलं सहजच... ) chocolate wrappers जमवले, स्टॅम्प्स गोळा केले, चांदोबा-चंपक-ठकठक जमवले... मग एकदा बातम्यांमध्ये ऐकलं की कोण्या माणसाने म्हणे त्याच्या संग्रहातलं जुनं नाणं काही लाखांना विकलं. झालं, आम्ही आमच्याकडची सगळी नाणी संग्रहात ठेवली. अशा कोणत्याही नाण्याला एवढी किंमत मिळत नाही हे कळेपर्यंत मोठा डबा भरला नाण्यांनी... एवढे पैसे आहेत हे कळल्यावर आईने दोन तीन रुपये देणं पण बंद केलं. मग हेच भंगलेलं लाखांच्या नाण्यांचं स्वप्न आणि सुट्टे पैसे घेऊन मी भरपूर दिवस काढले. काहीही आणायला जाताना घे सुट्टे नि जा असं चाललेलं. मैत्रिणी चिडवायच्या पण कि काय मग आज गंगेवर जाऊन आली वाटतं वगैरे... (पूर्वी कोणी काही बोललं तरी राग वगैरे येत नव्हता राव! हे ego बिगो थेरं शिंगं फुटल्यावर चालू झाली... ) असो !

जसा जसा काळ लोटत गेला तसे छंद पण बदलत गेले. कित्येकदा बासरी घेऊन वाजवायचा प्रयत्न केलाय पण या ना त्या कारणाने दोन दिवसांच्या वर ती बासरी बाहेर राहत नाही. मधल्या काळात पहा हौशी फोटोग्राफर्स चा पूर आलेला...सांगायला हरकत नाही, मी त्या पूरामधला एक थेंब! पण फक्त हौशेपोटी कॅमेरे बिमेरे नाही घेतले. परवडत पण नाही. तर मी फोनमधल्या कॅमेराचा पुरेपूर आस्वाद घेतलाय... एकदा बाहेरगावी गेलेलो तेव्हा मला रस्त्याच्या कडेला एक खूपच सुंदर रुईचं(?) फूल दिसलं. आता सौंदर्य काय पाहणाऱ्याच्या नजरेत असावं लागतं 😏... ट्रॅफिक पण नव्हती, तर मी गाडीतून उतरून त्याचा फोटो काढत होते. हा अँगल, तो अँगल, खाली बसून, उभी राहून... मी असं काही करत असले कि माझा नवरा मी हिला ओळखतच नाही असे भाव चेहेऱ्यावर घेऊन बाजूला उभा राहतो. ह्या वेळी त्याने गाडीतून उतरायची पण तसदी घेतली नाही. तर, माझी छंद-साधना पूर्ण करणं चालू असताना एक दुचाकी आली त्याने लांबूनच माझी साधना पहिली आणि तो सर-सकट confuse झाला... त्याने गाडीचा speed कमी केला आणि माझ्याकडे पाहत हळू हळू जाऊ लागला... त्याला एवढा प्रश्न पडला कि मी काय करतेय तो पुढे जाऊन सुद्धा मागे वळून गाडी चालवत होता. मी त्याच्याकडे पाहिलं तर एकदम त्याचा तोलच गेला... परत गाडीवर बसून तो पुढे निघून गेला. माझा नवरा आणि मी जोरात हसणार एवढ्यात तो दुचाकीस्वार यू-टर्न घेऊन परत आलेला... त्याने गाडी बाजूला लावली आणि थोड्या अंतरावर मोठ्ठ प्रश्नचिन्ह घेऊन पाहत उभा राहिला... मला पण जाम हुक्की आली मी मुद्दाम वर आकाशात पाहिलं फोटो काढला आणि परत "ऑ " expression देऊन आकाशात पाहत उभी राहिले. हे पाहून तो पण वर पाहायला लागला. हसू आवरत मी गंभीर मुद्रेने आकाशात पाहत होते. अजून एक-दोघं थांबले कुतूहलापोटी... ते पण वर काय दिसतंय ते पाहत होते. नवरोबाचं हसू फुटायवर होतं. मी फक्त एकदा बोट वर केलं आणि "ओह " म्हंटलं... तसं एकाने विचारलं काय हो मॅडम काय आहे? मी फक्त गंभीर मुद्रेने मान हलवली... तसं ते परत वर पाहायला लागले... आणखी लोक जमायला लागल्यावर मी हळूच काढता पाय घेतला. मी आणि नवरोबा तिथून पसार झालो आणि तासभर तरी वेड्यासारखं हसत होतो... आज सुद्धा मोबाईलने फोटो काढताना या प्रसंगाची हमखास आठवण येते आणि हसू येतं.

तर असे हे आमचे छंद आणि असे आमचे नस्ते उद्योग...!



 




तळटीप : हाच तो रुईचा फोटो!(लगे फोटोग्राफी स्किल वगैरे काढू नका !)😎



शुक्रवार, २० डिसेंबर, २०१९

एक आठवण : बच्चू


एक आठवण : बच्चू


आता हा meme(याचा उच्चार "मीम" असा होतो "मे मे" नाही हे कळायला खूपच वेळ गेला, म्हणून विंग्रजीत लिहिलंय, असो) पाहिल्यावर बराच वेळ हसण्यात गेला. पु.ल. आणि त्यांचं लिखाण आठवलं. त्यांची बरीच वाक्यं दैनंदिन आयुष्यात काही प्रसंगांच्यावेळी न राहावून आठवतात. वरच्या त्यांच्या वाक्यांनी माझ्या आयुष्यातल्या एका नग मित्राची खूपच आठवण आली. (तुम्हाला वाटलं असेल मी रा.गां. वर लिहीन काही, तर जाम भ्रमनिरास वगैरे होणारे तुमचा... एक तर मला त्याच्यावर लिहिण्यात (अजून तरी ) इंटरेस्ट नाहीये. जेव्हा येईल तेव्हा बघू... आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्याची आठवण या प्रसंगी मला झालीय तो काही याच्यापेक्षा कमी नाहीये. थोडक्यात काय तर माझ्या डोक्याला झालेला ताण इथे लिहून मोकळा करणार आहे. )

तर, आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात आपल्या ओळखीची अशी एक तरी व्यक्ती असतेच की जी आत्यंतिक बधिर लेव्हलची असते आणि तरीही ती आपल्या आयुष्यात असते ( पण का ? असा प्रश्न डोक्यात येत राहतो... माणसं Erase/delete नाही ना करता येत... पण कधी वाटतं बरंय यार ! अशी माणसं नसली तर आयुष्यात variety काय राहील, तर असो! ) अशी ती चिवित्र व्यक्ती म्हणजे आमचा बच्चू ... (उगीच सतत बच्चन देतो म्हणून बच्चू! क्यूट वगैरे आहे म्हणून नव्हे!) तर हा आमचा बच्चू गूगल चा जरा जास्तंच वापर करतो. याला वाटतं कि आपणच लै भारी... आपण नेटफ्लिक्स वगैरे टाईप्स अँप्स वापरतो, ओरिजिनल्स, विंग्रजी सिनेमे, सिरिअली वगैरे पाहतो म्हणजे आपण अमेरिकेतच जन्मायला हवे होतो असा थोडक्यात यांचा chutzpah... (chutzpah हि द्यावी वाटली तरी शिवी नाहीये याचा अर्थ इथे पहा https://en.wikipedia.org/wiki/Chutzpah. हा शब्द माझ्या शब्दकोशात यायचं कारण पण हाच महाभाग ! कधी वाटतं तिकडेच जन्माला आला असता तर बरं झाला असतं.) हा एकदा बोलायला सुरुवात झाली कि कमीत कमी तीन-चार तास गेलेच समजायचं . त्यामुळे हा भेटला कि काहीतरी करून विषय टाळून तिथून पोबारा करणे हे आपलं डोकं शांत ठेवण्याचं एकमेव सोल्यूशन आहे.तसा हा मनाने एवढा पण वाईट नाहीये, म्हणून आमच्यासारखे लोक त्याला सहन करतात. पण डोक्याला मुंग्या येणे काय असतं हे याच्या सहवासात प्रत्यक्ष अनुभवायला मिळतं.(जे आहे ते आहे यार !) तर असा आमचा बच्चू बरेच महिन्यांनी भेटला तो टी-शर्ट, हाफ प्यांट, डोळ्यावर गॉगल, स्लीपर अशा अवतारात! बरेच दिवसांनी भेटला म्हणून थोड्या गप्पा मारल्या इकडच्या-तिकडच्या!(म्हणजे तो बोलत होता आणि आम्ही (आदरार्थी अनेकवचनी) होकारार्थी मान हलवणे, हं-हं करणे, झालंच तर एखाद वाक्य बोलणे असं चाललं होतं आता सटकायची वेळ आलेली) तो पर्यंत सगळं काही व्यवस्थित होतं, मला वाटलं सुधारला हा... पण कुठून दुर्बुद्धी झाली च्यामारी आणि तोंडातून निघून गेलं कि "दुनिया गोल है". बस्स झालं तर काम. (काही लोक आपल्या प्रत्येक गोष्टीवर आक्षेप घेतात आणि त्यांचं म्हणणंच कसं बरोबर आहे हे (आपण तुझंच बरोबर असं म्हणून सुद्धा) पटवून देतात त्यांचा लीडर आहे हा बच्चू !) माझ्या वाक्याला 'म्हण' म्हणून न घेता चॅलेन्ज म्हणून घेतलं याने ! (पाद्र्याला पावट्याचं निमित्त !) माझ्याकडे तुच्छ नजरेने पाहत आणि जवळपास तीन तास पृथ्वी गोल नसून सपाटच आहे यावर डोस पाजले.(आर्यभट्ट, न्यूटन वगैरे मंडळी यांच्या दृष्टीने येडे ! इथे अशा प्रसंगी पुलं ची वरच्या मीम मधली वाक्यं (आपण कोण आहोत, आपला शैक्षणिक दर्जा काय, एकूण कर्तृत्त्व काय, याचा अजिबात विचार न करता मत ठोकून द्यायचं. विषय कुठलाही असो.) त्यांनी जशी म्हंटली तशीच्या तशी डोक्यात वाजतात...हा जन्म-कर्माने कुठला ते वेगळं सांगायलाच नको !) ह्याच्या तावडीतून सुटण्यासाठी पृथ्वीचं काय घेता, अख्ख ब्रह्माण्ड सपाट आहे हे मान्य करायला मी तयार आहे (भीक नको पण कुत्र आवर!). तर आम्ही कसे कोणीही काहीही सांगतं त्यावर विश्वास ठेवतो, वर्षानुवर्षे काही लोक सर्वांना पृथ्वी गोल आहे हे सांगून मुर्खात काढतात, नासा वगैरे पीपल्स कसे conspiracy वगैरे करतात आणि आमच्यासारख्या सामान्यांना भ्रमात ठेवतात, वगैरे वगैरे पोटतिडकीने पटवून देत माझे तीन तास सुद्धा याने लीलया सपाट करून टाकले. याच्या कोणत्याही गोष्टीला मी आक्षेप घेण्याची हिम्मत केली नाही कारण त्यामुळे आणि वेळ सपाट झाला असता! (अशा वेळी कंठ शिव्यांनी पार दाटून आलेला पण आवरलं)

बरेच दिवसांनी भेटल्यावर generally लोक तुझं काय- माझं काय, याचं काय-त्याचं काय वगैरे बोलतात, आठवणींना उजाळा देतात पण आमचा बच्चू नॉर्मल च्या व्याख्येत कुठेच बसत नाही! त्यानंतर एक अत्यंत मौल्यवान फोनकॉल श्री बच्चू यांना आल्यामुळे माझी त्या भेटीतून सुटका झाली (पुलं म्हणाले होते त्याप्रमाणे त्या व्यक्तीचा मी खरंच जाहीर मुका घ्यायला सुद्धा तयार आहे!) या ऐतिहासिक भेटीनंतर कमीत कमी दोन दिवस डोक्याला मुंग्या आल्या होत्या! अपरिहार्यता, उद्वेग, अगतिकता वगैरे शब्दांचे अर्थ या प्रसंगामुळे अगदीच कळाले हीच एक काय ती जमेची बाजू!

नुसतं आठवणीने सुद्धा डोकं पार जाम झालाय त्यामुळे इथेच थांबलेलं बरं!