हा ब्लॉग शोधा

शुक्रवार, २० डिसेंबर, २०१९

एक आठवण : बच्चू


एक आठवण : बच्चू


आता हा meme(याचा उच्चार "मीम" असा होतो "मे मे" नाही हे कळायला खूपच वेळ गेला, म्हणून विंग्रजीत लिहिलंय, असो) पाहिल्यावर बराच वेळ हसण्यात गेला. पु.. आणि त्यांचं लिखाण आठवलं. त्यांची बरीच वाक्यं दैनंदिन आयुष्यात काही प्रसंगांच्यावेळी राहावून आठवतात. वरच्या त्यांच्या वाक्यांनी माझ्या आयुष्यातल्या एका नग मित्राची खूपच आठवण आली. (तुम्हाला वाटलं असेल मी रा.गां. वर लिहीन काही, तर जाम भ्रमनिरास वगैरे होणारे तुमचा... एक तर मला त्याच्यावर लिहिण्यात (अजून तरी ) इंटरेस्ट नाहीये. जेव्हा येईल तेव्हा बघू... आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्याची आठवण या प्रसंगी मला झालीय तो काही याच्यापेक्षा कमी नाहीये. थोडक्यात काय तर माझ्या डोक्याला झालेला ताण इथे लिहून मोकळा करणार आहे. )

तर, आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात आपल्या ओळखीची अशी एक तरी व्यक्ती असतेच की जी आत्यंतिक बधिर लेव्हलची असते आणि तरीही ती आपल्या आयुष्यात असते ( पण का ? असा प्रश्न डोक्यात येत राहतो... माणसं Erase/delete नाही ना करता येत... पण कधी वाटतं बरंय यार ! अशी माणसं नसली तर आयुष्यात variety काय राहील, तर असो! ) अशी ती चिवित्र व्यक्ती म्हणजे आमचा बच्चू ... (उगीच सतत बच्चन देतो म्हणून बच्चू! क्यूट वगैरे आहे म्हणून नव्हे!) तर हा आमचा बच्चू गूगल चा जरा जास्तंच वापर करतो. याला वाटतं कि आपणच लै भारी... आपण नेटफ्लिक्स वगैरे टाईप्स अँप्स वापरतो, ओरिजिनल्स, विंग्रजी सिनेमे, सिरिअली वगैरे पाहतो म्हणजे आपण अमेरिकेतच जन्मायला हवे होतो असा थोडक्यात यांचा chutzpah... (chutzpah हि द्यावी वाटली तरी शिवी नाहीये याचा अर्थ इथे पहा https://en.wikipedia.org/wiki/Chutzpah. हा शब्द माझ्या शब्दकोशात यायचं कारण पण हाच महाभाग ! कधी वाटतं तिकडेच जन्माला आला असता तर बरं झाला असतं.) हा एकदा बोलायला सुरुवात झाली कि कमीत कमी तीन-चार तास गेलेच समजायचं . त्यामुळे हा भेटला कि काहीतरी करून विषय टाळून तिथून पोबारा करणे हे आपलं डोकं शांत ठेवण्याचं एकमेव सोल्यूशन आहे.तसा हा मनाने एवढा पण वाईट नाहीये, म्हणून आमच्यासारखे लोक त्याला सहन करतात. पण डोक्याला मुंग्या येणे काय असतं हे याच्या सहवासात प्रत्यक्ष अनुभवायला मिळतं.(जे आहे ते आहे यार !) तर असा आमचा बच्चू बरेच महिन्यांनी भेटला तो टी-शर्ट, हाफ प्यांट, डोळ्यावर गॉगल, स्लीपर अशा अवतारात! बरेच दिवसांनी भेटला म्हणून थोड्या गप्पा मारल्या इकडच्या-तिकडच्या!(म्हणजे तो बोलत होता आणि आम्ही (आदरार्थी अनेकवचनी) होकारार्थी मान हलवणे, हं-हं करणे, झालंच तर एखाद वाक्य बोलणे असं चाललं होतं आता सटकायची वेळ आलेली) तो पर्यंत सगळं काही व्यवस्थित होतं, मला वाटलं सुधारला हा... पण कुठून दुर्बुद्धी झाली च्यामारी आणि तोंडातून निघून गेलं कि "दुनिया गोल है". बस्स झालं तर काम. (काही लोक आपल्या प्रत्येक गोष्टीवर आक्षेप घेतात आणि त्यांचं म्हणणंच कसं बरोबर आहे हे (आपण तुझंच बरोबर असं म्हणून सुद्धा) पटवून देतात त्यांचा लीडर आहे हा बच्चू !) माझ्या वाक्याला 'म्हण' म्हणून न घेता चॅलेन्ज म्हणून घेतलं याने ! (पाद्र्याला पावट्याचं निमित्त !) माझ्याकडे तुच्छ नजरेने पाहत आणि जवळपास तीन तास पृथ्वी गोल नसून सपाटच आहे यावर डोस पाजले.(आर्यभट्ट, न्यूटन वगैरे मंडळी यांच्या दृष्टीने येडे ! इथे अशा प्रसंगी पुलं ची वरच्या मीम मधली वाक्यं (आपण कोण आहोत, आपला शैक्षणिक दर्जा काय, एकूण कर्तृत्त्व काय, याचा अजिबात विचार न करता मत ठोकून द्यायचं. विषय कुठलाही असो.) त्यांनी जशी म्हंटली तशीच्या तशी डोक्यात वाजतात...हा जन्म-कर्माने कुठला ते वेगळं सांगायलाच नको !) ह्याच्या तावडीतून सुटण्यासाठी पृथ्वीचं काय घेता, अख्ख ब्रह्माण्ड सपाट आहे हे मान्य करायला मी तयार आहे (भीक नको पण कुत्र आवर!). तर आम्ही कसे कोणीही काहीही सांगतं त्यावर विश्वास ठेवतो, वर्षानुवर्षे काही लोक सर्वांना पृथ्वी गोल आहे हे सांगून मुर्खात काढतात, नासा वगैरे पीपल्स कसे conspiracy वगैरे करतात आणि आमच्यासारख्या सामान्यांना भ्रमात ठेवतात, वगैरे वगैरे पोटतिडकीने पटवून देत माझे तीन तास सुद्धा याने लीलया सपाट करून टाकले. याच्या कोणत्याही गोष्टीला मी आक्षेप घेण्याची हिम्मत केली नाही कारण त्यामुळे आणि वेळ सपाट झाला असता! (अशा वेळी कंठ शिव्यांनी पार दाटून आलेला पण आवरलं)

बरेच दिवसांनी भेटल्यावर generally लोक तुझं काय- माझं काय, याचं काय-त्याचं काय वगैरे बोलतात, आठवणींना उजाळा देतात पण आमचा बच्चू नॉर्मल च्या व्याख्येत कुठेच बसत नाही! त्यानंतर एक अत्यंत मौल्यवान फोनकॉल श्री बच्चू यांना आल्यामुळे माझी त्या भेटीतून सुटका झाली (पुलं म्हणाले होते त्याप्रमाणे त्या व्यक्तीचा मी खरंच जाहीर मुका घ्यायला सुद्धा तयार आहे!) या ऐतिहासिक भेटीनंतर कमीत कमी दोन दिवस डोक्याला मुंग्या आल्या होत्या! अपरिहार्यता, उद्वेग, अगतिकता वगैरे शब्दांचे अर्थ या प्रसंगामुळे अगदीच कळाले हीच एक काय ती जमेची बाजू!

नुसतं आठवणीने सुद्धा डोकं पार जाम झालाय त्यामुळे इथेच थांबलेलं बरं!




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा