हा ब्लॉग शोधा

मंगळवार, २४ डिसेंबर, २०१९

पावट्याचं निमित्त


पावट्याचं निमित्त

म्हणी मला खूप आवडतात. मागच्याच वेळी एक म्हण लिहिण्यात आली आणि या पोस्टचं निमित्त झाली.
आपल्या सर्वांच्या आयुष्यात एक अशी गोष्ट म्हणा/ क्रिया म्हणा... आहे जी फारच सामान्य/ नेहेमीचीच आहे. सगळे लोक करतात पण सार्वजनिकरित्या हि गोष्ट टाळली जाते, किंबहुना तिचा उल्लेख पण आपण शक्यतो टाळतोच. मोकळेपणे याविषयी बोललं जात नाही. ह्या क्रियेविषयी बोलणं म्यानारलेस किंवा असांस्कृतिक, असामाजिक वगैरे समजलं जाऊ शकतं. पण आज इथे आम्ही या गोष्टीवरच लिहिणार !

तेव्हा आजचा विषय आहे  "पादणे "

बऱ्याच लोकांना हि क्रिया असभ्य वगैरे वाटते, पण हा एक अत्यंत नैसर्गिक शरीरधर्म आहे. शिंक येणे, खाज येणे हे जितकं नैसर्गिक, तितकीच नैसर्गिक असते हि "पाद-क्रिया"! माणूस/बाई जेवढ्या मोकळेपणे शिंकते तेवढ्या मोकळेपणे पादत मात्र नाही. काही लोकांना हि क्रिया आत्यंतिक असांस्कृतिक वगैरे वाटते. अशा व्यक्ती आपण जसं पादतच नाही असा अविर्भाव चेहेऱ्यावर आणून बसतात. पण जेवढं महत्त्वाचं शिंक येणं तेवढंच महत्त्वाचं पादणं असं माझं वैयक्तिक पण स्पष्ट मत आहे. या संपुर्ण विश्वात सर्वात समाधान किंवा सुख कशाने मिळते तर ते म्हणजे ज्या ठिकाणी खाज आलीये बरोब्बर त्याच स्पॉटला खाजवता येणे किंवा मोकळेपणे पादणे! जर कोणी मला सर्वात सुखी माणसाचं चित्र काढ असं म्हंटलं तर मी मोकळेपणे पादणाऱ्या व्यक्तीचं चित्र काढेन (बायका पादत नाहीत वगैरे मिथ्या गोष्टी आहेत. इथेपण टक्करका सामना मिळू शकतो हे मी शपथेवर सांगेन). पादणे हा आपल्या जीवनातला बहुमूल्य भाग आहे. (नाहीतर बसा पॉट धरून, डोकं धरून, 'मला कि नई कसंतरीच होतंय' म्हणत. एकदा का टुररकऩ पादलं कि सगळे त्रास बंद आहे कि नाही जादू! म्हणून बहुमूल्य!) आपण चारचौघात पादायला, त्याविषयी बोलायला संकोचतो खरं पण आपल्याला हे पण माहिती पाहिजे कि हि नैसर्गिक बाब फक्त हसण्यावारी नेण्यासारखी नाहीये. म्यानर्स च्या नावाखाली जर पादवायू फारवेळ दाबून ठेवला तर एखाद्याचा जीव पण जाऊ शकतो हे आपल्याला माहीतच नसतं. थोडा जिभेवर ताबा ठेवला तर हे प्रसंग टाळता येऊ शकतात पण कायमच नाही. तेव्हा आयुष्यभर संकोच करण्यापेक्षा मोकळेपणे,बिनधास्तपणे पादावं. एक्स्क्यूझ मी किंवा सॉरी म्हणून मोकळं व्हावं, एवढं सोप्पं आहे हे! आपण कितीतरी वेळा अश्या प्रसंगात असतो जेव्हा हे आपण करतो पण ! मस्तपैकी हसतो आणि मजा घेतो. कधी कधी विचार येतो कि हे जे महान वगैरे लोक होऊन गेले त्यांच्या आयुष्यात पण काही असे प्रसंग आलेच असतील नाही! त्यांच्या चरित्रांमध्ये एकदाही अशा मजेशीर प्रसंगाची नोंद आढळत नाही. कितीही झालं तरी हाडा-मांसाची माणसं ती ! ती कधी पादलीच नसतील हे म्हणणं अनैसर्गिक ठरेल नाही? पादण्याचा पण उल्लेख इतिहासात असता तर इतिहास सुद्धा आवडीचा विषय झाला असता.

(कधी असाच विचार करता-करता खालचे प्रसंग डोळ्यासमोर उभे राहिले. तसे काल्पनिक आहेत पण असे घडले पण असतील, कदाचित Image building वगैरे त्याही काळात असल्याने वगळले असतील चरित्रांमधून!
प्रसंग क्र.१: असा मस्तपैकी दरबार भरलेला आहे. कर माफ करण्याविषयी चर्चा चालू आहे, ब्रेक ची वेळ झाली. पावट्याची भाजी मस्तच झाल्याने जास्तंच खाऊन पादशाह सदरेवर आले आणि मधेच पादशाहांनी त्यांची तशरीफ थोडी वरच्या दिशेला ढकलली आणि शंखनाद केला. पावट्याचं महत्त्व लक्षात आल्याने पादशाहाने हुकूम दिला "कर ६२% वाढावा" (त्याला पावट्यावरचा कर वाढवायचा होता पण संतापात कर वाढवा म्हणाला ). सगळ्यांवरचाच कर ६२% वाढविण्यात आला.(६२% का ? तर असंच ! माझ्या डोक्यातली ष्टोरी आहे मला वाटलं ६२% म्हणून ६२%!)
प्रसंग क्र.२:  सामान्यांना कळेचना की कर माफ होणार असताना कर का वाढला, त्यामुळे सामान्य जनतेत अराजकता माजली. क्रांतिकारी संघटना स्थापन झाल्या. त्यांनी पादशाह सोबत युद्धाचं रणशिंग फुंकलं. पादशाहला तोपर्यंत पादण्याची सवय झालेली, पावटा जेवणात असो वा नसो! युद्ध सुरु झालं, वेगवेगळी शस्त्र वापरण्यात आली पण युद्धाच्या शेवटाचा मार्ग दिसेना. परस्पर सामंजस्याने युद्ध संपवावं असा ठराव पादशाहाने क्रांतिकारकांच्या लीडर समोर ठेवला.
प्रसंग क्र.३:  क्रांतिकारकांचा लीडर आणि पादशाह भेट होणार असते. पावट्यावरचा कर का वाढवला हे लीडरला समजावणार या धुंदीत पादशाह असतो. लीडर येतो, बैठक सुरु होते. पादशाहला त्याची चूक लक्षात येते एका पावट्यामुळे त्याने सर्व वस्तूंवर कर लादला, आणि तो कर माफ करायच्या निर्णयावर येतो. सवयीनुसार प्रेशर वाढल्याने पाद-वायू हळूच सोडण्याच्या प्रयत्नात एकदम जोरदार आवाज होतो. बैठकीत हसावं कि नाही या विवंचनेत बाकीचे असताना पादशाहाच जोरात खळखळून हसतो आणि खोटं- खोटं सांगतो की हा पावट्याच्या भाजीचा प्रताप आहे. आणि अशा प्रकारे पावट्याला निमित्त करून राजाने आपण पाद्रे आहोत हे मान्य करायचं टाळलं ! 
(यावरूनच पुढे महान म्हण अस्तित्त्वात आली "पाद्र्याला पावट्याचं निमित्त! ") कर रद्द झाले आणि युद्ध संपलं. 
वरच्या (भंगार छाप) लेखनावरून मी पुढच्या हाऊसफुलची स्क्रिप्ट लिहू शकेन असं वाटायला लागलंय! असो! )
तर... पादणं वाईट असतं का? नक्कीच नाही! उलट आपली पचनक्रिया व्यवस्थित असल्याचं मूर्तीमंत लक्षण आहे पादणे! पूर्वी इजिप्त का कुठले लोक म्हणे पादवायू बरणीत बंद करून ठेवत आणि आरोग्यासाठी चांगलं म्हणून त्याचा वास घेत असत. असो! पादण्याचे पण प्रकार असतात हे ३ इडियट्स मधे सांगितलंच आहे. हळूच पादणं काहीच लोकांना जमतं, स्किलच असतं ते ! काहीजण फक्त वास सोडतात आणि दुसऱ्यांवर नाव घेतात. (पाद-शाह शब्द यांच्याच मुळे आला असावा ) सुरतमध्ये पूर्वी एक स्पर्धा पण झालेली पादायची! अतिउत्साही कार्यकर्त्यांनी अशा स्पर्धांना जायला हरकत नाही.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे पादण्याने बी.पी. व्यवस्थित राहतं. रणवीर ची चिंग्स ची ऍड पाहिल्यावर प्रश्न पडला खरंच आग लागू शकते? तर हो! आपल्या  पादवायूला आग लागू शकते. प्राणी, किडे वगैरे सुद्धा पादतात! एका माणसाने दावा केलेला कि त्याच्या पादण्याने डास मरतात!
आता तुम्ही म्हणाल डोक्यावर पाटी लिहून फिरायचं का की "आम्ही पादतो"? असं म्हणणं नाही, पण जे गुप्त टूरक्या सोडून "मी नाही त्यातली" असं भासवतात किंवा पादवायू दाबून ठेवतात त्यांनी Denial मधे राहून स्वतःची तब्येत बिघडवून घेऊ नये. पादण्यामुळे मिळणाऱ्या आंतरिक सुख-समाधानाचा आस्वाद मोकळेपणे घ्यावा आणि दुसऱ्याला हसवण्याने मिळणारं फुकटचं पुण्य कमवावं !
  
अखिल भारतीय 'होईल वाद, पण हक्काने पाद' कमिटीला सादर समर्पित !

ता. . : मी प्रयत्न केला चित्र काढायचा तो पुढीलप्रमाणे:







1 टिप्पणी: