हा ब्लॉग शोधा

गुरुवार, १० ऑक्टोबर, २०१९

तो राजहंस एक...

तो राजहंस एक... 



आपलं पहिल्यापासूनच जरा वेगळंच आहे असं प्रत्येकालाच वाटतं पण आपल्यासारखे अनुभव असणारंच नाहीत म्हणून अनेक महाभागांना अंडरएस्टीमेट पण करता येत नाही. तर असो!

शाळेत असताना असंच वाटायचं कि आपल्यालाच कळलंय त्या कुरूप बदक-पिलाचं दुःख... बरं आमचं (म्हणजे आमच्या सारख्या सर्वसामान्य विद्यार्थी-विद्यार्थिनीचं ) कसं होतं ना की जोपर्यंत एखादी कविता परीक्षेमध्ये असायची तो पर्यंत ती अजिबातच झेपायची नाही. एकदा का परीक्षा संपली रे संपली कि त्या कवितांचा अर्थ थोडाफार समजायला लागे.(अजूनही बर्याचश्या कवितांचा अर्थ कळत नाही) अशाच जेव्हा (परीक्षेची) गरज होती तेव्हा न समजलेल्या कवितांपैकी हि ग. दि माडगूळकरांची सुंदर कविता.

हल्लीच्या पोरांना ह्या कविता रिलेट होतात कि नाही माहिती नाही (त्यांना मराठी तरी धड लिहिता-वाचता येते का हा प्रश्नच आहे, ते सर्व नंतर... ) पण आम्हाला अशा कविता जाम रिलेट व्हायच्या. आमच्या सुट्टीच्या वेळी " कोणी ना त्यास घेई खेळावयास संगे " आणि "भावंडं ना विचारी, सांगेल ते कुणाशी ? " वगैरे ओळी जामच आठवायच्या आणि सेंटीमेंटल कि काय व्हायचं. एकत्र कुटुंब असायची तेव्हा बरीच आणि नसली तरी सुट्ट्यांमध्ये गावी वगैरे एकत्रच यायची सर्व  चुलत, आते, मामे वगैरे भावंडं. तेव्हा असली धमाल करायचे सर्व कि एरवी मोठ्यांना घाबरणारे सुद्धा खोड्या काढायला लागायचे.

तर मुद्दा असा कि त्या कवितेतल्या कुरूप, वेड्या पिलाचं दुःख अशाच सुट्ट्यांमध्ये जी लहान भावंडं आहेत त्यांना ढिगाने व्हायचं. मोठी भावंडं गप्पांमध्ये घेणार नाहीत कारण यांना काय समजणार (आणि आधी कधी तरी गप्पांमध्ये घेतल्यावर कळलं नाही त्याचे अर्थ विचारत बसल्याने जाऊदे याला समाजवण्यापेक्षा न घेतलेलं बरं) ...आणि खेळताना तर काय पाणी पाजलंय म्हणून सांगू ... खेळून नव्हे, खरोखर पाण्याच्या बाटल्या घरातून भरून आणणे तहान लागली कि मोठ्या भावंडांना पाणी पाजणे अशी कामं करून. मोठ्यांना पाणी देणे, त्यांच्या वस्तू सांभाळणे, त्यांची कामं करणे, मैदान साफ करणे, त्यांच्या विनोदाचे विषय होणे अशा टुच्च्या कामांसाठीच लहान भावंडं असतात असा समज व्हायला लागलेला. अशा परिस्थितीत जेव्हा हि कविता परीक्षा देऊन झाल्यावर सुट्टीत थोडी फार कळायला लागली तेव्हा अगदीच सेंटी होऊन ह्या भावंडांना ऐकवली तेव्हा...
... तेव्हा ते पण सेंटी झाले असं समजलात तर साफ चुकलात लोकहो...  ती कविता ऐकवल्यावर "आले मोठे राजहंस " "पळ आता आमच्यासाठी काहीतरी खायला घेऊन ये " असं म्हणून हकालपट्टी झाली आणि अशा थोड्या फार समजलेल्या कविता भावंडांना ऐकवणं सोडून दिलं.

थोडक्यात काय, आमच्यात नव्याने उमललेल्या राजहंसाचं पुन्हा एकदा बदक झालं...





1 टिप्पणी: